पान:वाटचाल (Vatchal).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो प्रसंग आठवला की-: १७

फक्त हसलो. मामा म्हणाले, " अरे, हसतोय काय ? तात्पर्य सांग की." मी मराठीतून महाभारत वाचलेले होते. मी म्हटले, “ अण्णामामा, (आम्ही नांदापूरकरांना अण्णामामा म्हणत असू.) ही गोष्ट कलियुगातली कीं त्या आधीची ?" ते म्हणाले, " अरे, ही गोष्ट फार जुनी, सत्ययुगातली." मी म्हटले, "मग तात्पर्य फार सोपे आहे. सत्ययुगातही माणसे आपल्याइतकीच लबाड होती, भांडखोर होती, हे तात्पर्य !!
 अण्णामामा म्हणाले, " चांडाळा ! तू नक्की नरकात जाणार ! काकासाहेबांना तू तात्पर्य सांगितलेस, तेव्हा मला शंका होती. म्हटले न जाणो खरेच याला असे तात्पर्य वाटले असेल. पण आता खात्री पटली. तात्पर्य वगैरे काही नाही. तू आहेस लबाड आणि खोडसाळ, तू बरोवर वाकड्यात शिरणार!"
 पण मग मामा म्हणायचे, "मी नरहरीबरोवर नरकात गेलो, तर मला वाईट वाटणार नाही." तेव्हापासून मामा मला आचार्य म्हणू लागले.
 मीही माझ्या मुलांना गोष्टी सांगतो. मग मीच तात्पर्य सांगतो, कधी मुलांना तात्पर्य विचारत नाही. तात्पर्य सांगण्याची वेळ आली की मला रागीट काकासाहेब जोशी आठवतात, माझे प्रेमळ मामा आठवतात, माझा लहानपणचा खोडसाळपणाही आठवतो. माझ्यासारखी खोडसाळ मुले मला फार दिसत नाहीत; ती फार हवीत, असे वाटते.