पान:वाटचाल (Vatchal).pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हमीद दलवाई : १३९

 इस्लामवरील श्रद्धा, पैगंबरांवरील श्रद्धा, इस्लामच्या धार्मिक व राजकीय इतिहासावरील श्रद्धा या सर्व चर्चा बाजूला सारून तलाकपीडित महिलांचा प्रश्न हाती घेऊन सामाजिक आंदोलन करायला ते तयार होते. पण दलवाई अतिरेकी जरी नसले तरी सुधारणेचा लहान अगर मोठा कोणताच कार्यक्रम स्वीकारून मुस्लिम मन ढवळण्यास त्या समाजातील कार्यकर्ते तयार नव्हते. कोणत्याही प्रकारचा बदल मान्य न करता आपला परंपरावाद जतन करीतच आपण राहू, तेच आपल्या सोयीचे आहे असे नेते समजत आणि या सेक्युलॅरिझमच्या सर्व द्रोही नेत्यांना हिंदू पुरोगामी नेते नेटाने पाठिंबा देत, मग दलवाईना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा मिळू नये ही परिस्थिती बदलणार कशी?
 माझा आणि दलवाईचा अगदी आरंभापासून म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन करण्याच्या काही वर्षे आधीपासून संबंध होता. दलवाईनी मुस्लिम तरुणांना व कार्यकर्त्यांना पुन:पुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न केला की आपण एखाद्या छोटया प्रश्नापासून आरंभ करू. एकदा तर ते असे म्हणाले की, बाकी सगळे सोडा, आपल्या सर्व सभा जन-गण-मन या राष्ट्रगीताने संपल्या पाहिजेत, इतक्या मुद्द्यावर तरी तुम्ही आंदोलन करायला तयार आहात काय ? पण त्यालाही कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही. आपल्या विजयाचा एके काळचा इतिहास सदैव स्मरणात जागा ठेवणाऱ्या परंपरावाद्यांना परिवर्तनाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्षात उतरू शकेल असा कोणताही प्रामाणिक आरंभच नको होता.
 तरीही दलवाईना आरंभाला दहा-वीस कार्यकर्ते मिळालेच. दरसाल हे कार्यकर्ते वाढतच जात होते. तलाकपीडित महिलांच्या परिषदा हळूहळू सर्वत्र भरू लागल्या. आरंभी या परिषदांना १५-२० मुस्लिम महिला जमणे कठीण होते ; पण गेल्या डिसेंबरात अमरावती येथे भरलेल्या तलाकपीडित महिलांच्या परिषदेला संचालकांच्या अपेक्षेच्या बाहेर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की पुरुष प्रेक्षकांना हॉल रिकामा करून द्यावा लागला! हे चित्र क्रमाने प्रतिसाद वाढत आहे याचे आहे. दलवाईंचा विचार क्रमाने समाजात रुजतो, पाझरतो आहे याचे चित्र आहे. दलवाई समाजातून तुटून बाजूला गेले याचे हे चित्र नाही.
 आपण स्वतःच्या मनाशी जेव्हा विचार करतो त्या वेळी सतत एक प्रश्न विचारला पाहिजे की गुलाम राष्ट्रातील स्वातंत्र्यलढे पुनःपुन्हा पराभूत होतात म्हणून गुलामगिरी अमर राहील असे आपण मानणार आहोत काय ? दहा उठाव फसतील, पण शेवटी संपणार आहे ती गुलामगिरी. स्वातंत्र्याची आकांक्षा संपत नसते. आज बोहरी समाजात धर्मगुरूंच्या विरुद्ध आंदोलन चालू आहे. अजून धर्मगुरूंचीच अधिसत्ता या समाजावर चालते. पण उद्याचा विजय दाउदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचा असणार नाही; तो स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा राहील. अतिशय अजिंक्य