पान:वाटचाल (Vatchal).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४० : वाटचाल

आणि बलवान असणाऱ्या तटबंद्या या कितीही बलवान असोत, त्या शेवटी कोसळत चाललेल्या मावळत्या शक्ती आहेत. या मावळत्या शक्तींचा विजय फार काळ टिकणारा नसतो. मुस्लिम समाजही बदलतच जाणार आहे. तोंडाने नाही नाही म्हणत गोषा सोडून बाहेर येणाऱ्या स्त्रियांची संख्या सारखी वाढतच आहे, तिथूनच वाढतच जाणार आहे. आधुनिक शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या यापुढे वाढतच जाणार आहे. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत.
 थोडा उशीर लागेल. हे मान्य केले तरी अंधश्रद्धा, जळमटलेली मने कायमची गुलाम राहणार नाहीत. सगळेच हमीद दलवाईंप्रमाणे बंडखोर नसतील, पण कालमानानुसार 'मुस्लिम पर्सनल लॉ' मध्ये, मुस्लिम समाजात परिवर्तनाची भूक वाढवून दमादमाने बदल घडवून आणावा लागेल, असे म्हणणारे लोक त्याही समाजात तयार होत आहेत..परंपरावाद्यांचे बळ हे शेवटी मावळत्या शक्तींचे बळ असते. दलवाई हा नवा उगवता विचार आहे. दलवाईंच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी दलवाईंचा विचार वेगाने पसरत कसा जाईल याची काळजी घ्यावी. दलवाईंचे चाहते व अनुयायी तो विचार करतीलही, करीतही आहेत. पण उरलेल्यांनी हे लक्षात ठेवावे की, पराजय दलवाईचा होणार नसून परंपरावाद्यांचा होणार आहे. वर्षांची संख्या थोडी वाढेल, पण भवितव्याच्या या दिशेत बदल होण्याची शक्यता अजिबात नाही. ज्या शक्ती कदाचित १०-२० वर्षांत विजयी होणार नाहीत, ज्यांना विजयी व्हायला कदाचित १०० वर्षे लागतील, त्या शक्तींचा पराभव झालेला आहे असे समजत बसण्यात आपण आत्मवंचनेशिवाय दुसरे काही मिळवत नसतो.