पान:वाटचाल (Vatchal).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३८ : वाटचाल

मानणाऱ्या त्या पुरोगामी क्रांतिकारक पक्षाला दलवाईंचा निषेध करण्यापलीकड कधी विचार करावासा वाटला नाही ! काँग्रेस पक्षाचा पाडाव झाल्यामुळे गेल्या वर्षापासून ही परिस्थिती बदलली आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद जिव्हाळ्याने जतन करण्याचे काम जनता पक्ष अतिशय चोखपणे व काँग्रेसइतक्याच उत्साहाने पार पाडीत आहे! शासन प्रतिकूल, राजकीय पक्ष प्रतिकूल यामुळे तर दलवाईंचे कार्य अधिकच बिकट झाले.
 महात्मा फुले यांच्यापेक्षा दलवाइंचे कार्य अधिक बिकट होते, तरीही त्यांना मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्त्यांचा एक गट आपल्या अल्पशा आयुष्यात स्वतःभोवती गोळा करता आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तीन-चारशे स्त्री-पुरुष तरुण कार्यकर्ते पाहता पाहता दलवाईभोवती गोळा झाले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत इतके कार्यकर्ते दलवाईंना मिळाले हेच आश्चर्य आहे. हा प्रपंच मुद्दाम नोंदवण्याचे कारण हे की, हमीद दलवाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मित्रांनी सुद्धा त्यांच्याविषयी लिहिताना दोन गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे, दलवाईना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच मिळाला नाही ! आणि दुसरे म्हणजे,आयुष्याच्या अखेरीला दलवाई मुस्लिम समाजापासून तुटून पडलेले होते. दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहेतः पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली; त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीन-चारशे अनुयायी मिळाले!
 दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच नव्हता, तो असणारही नव्हता, हे अगदी उघड आहे. मुस्लिम समाजातील सर्व राजकीय नेते प्रामुख्याने दलवाईंचा विरोध करीत होते. दलवाईंनी अतिरेकी भूमिका घेतलेली होती, म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या मागे गेला नाही हे म्हणणे खरे नाही. दलवाईंनासुद्धा महान विचारवंत म्हणून कीर्ती मिळवण्याची इच्छा नव्हती. त्यांना समाजपरिवर्तनाचे आंदोलनच अधिक प्रिय होते. महंमद पैगंबर आणि कुराण यांबाबत चर्चा करून दररोज समाजाचे मन दुखवावे आणि पुरुषार्थ मिरवावा असे त्यांनाही वाटत नव्हते. दलवाई स्वत: नास्तिक आणि अश्रद्ध होते, पण मुस्लिम समाजाने नास्तिक व अश्रद्ध झालेच पाहिजे असा त्यांचा आग्रह नव्हता. समाजाचे आमूलाग्र परिवर्तन होणे आवश्यक आहे, इतके मान्य असणाऱ्या कार्यकत्यांनी आरंभ म्हणून कोणताही एक छोटासा कार्यक्रम घ्यावा आणि सुधारणेला समाज तयार करावा हे दलवाईंना मान्य होते.