पान:वाटचाल (Vatchal).pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हमीद दलवाई : १३७

नसला तरी सभ्य ठरतो. मुस्लिम समाजालासुद्धा इंग्रजी राजवट आल्यामुळे आपला पराभव झाला, असे वाटतच होते. पण या पराभवाचे कारण आपल्या धर्मात अगर परंपरेत काही चूक आहे, असे त्यांना वाटत नसे. आपला धर्म व परंपरा निर्दोष आहेत, पण या धर्मावर मुसलमानांची श्रद्धा पुरेशी बळकट नाही म्हणून आपला पराभव होतो असे या समाजातील नेत्यांना वाटे. इंग्रजी विद्या व ज्ञान यांविषयी आस्था असणारे सर सय्यद अहमदखानसुद्धा आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार करतात, स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार करतात, पण यापुढे जाऊन इस्लामची चिकित्सा ते करत नाहीत. ग्रंथप्रामाण्य झुगारून देऊन चिकित्सा करणारे पहिले मुस्लिम दलवाईच होत. दलवाईंची चिकित्सा ही नेहमीच मुसलमानांच्या हिताला बाधक आहे, असे त्यांच्या समाजाला वाटत आले. मुस्लिम समाजातील विचारवंतांचे मनच धर्माच्या चिकित्सेला फारसे तयार नसते. आजही ते तयार नाही. मुस्लिम समाजात राजकीय पराभव विचारवंतांना अधिक कर्मठ आणि परंपरावादी होण्याची प्रेरणा देतो. ही दलवाइंच्यासमोर दुसरी अडचण होती.
 आमच्या देशातील पुरोगामी राजकारणाची एक शोकांतिका आहे. महात्मा फुले यांच्या काळी फुले यांच्या प्रयत्नाला इंग्रजांनी फार मोठा पाठिंबा दिला नसला तरी त्यांचे शाब्दिक कौतुक केले. त्यांच्या उपक्रमास गौरवपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्यावर इतरांना सरळसरळ आक्रमण करता येऊ नये याची शासनाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काळजी घेतली. दलवाईंच्या बाबतीत असे घडले नाही. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजांनी हिंदू-मुस्लिम मतभेदाचा फायदा घेऊ नये म्हणून मुसलमानांच्याविषयी फारसे बोलायचेच नाही, होता होईतो त्यांच्या कर्मठपणाला पाठिंबाच द्यायचा अशी आमच्या नेत्यांची पद्धत राहिली. पुरोगामी राजकीय नेता जर हिंदू समाजातील असेल तर तो हिंदू समाजातील परंपरावादावर कडाडून हल्ला करी, पण मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद सांभाळून घेई. मुस्लिम समाजातील कोणताही पुरोगामी नेता आपल्या धर्मपरंपरेवर काही टीका करण्यास धजावतच नसे. इस्लाममध्ये लोकशाही आहेच, इस्लाममध्ये समाजवाद आहेच असे काहीतरी बोलून आपण इस्लामच सांगतो आहो असा आव हे नेते आणीत. स्वातंत्र्योत्तर काळात मते फुटू नयेत म्हणून मुसलमान समाजातील सर्व परंपरावाद जतन करण्याची चढाओढ आपल्या राजकीय पक्षात सुरू झाली. काँग्रेस तर सोडाच, पण ज्या राजकीय पक्षाशी दलवाईचा निकट संबंध होता तो समाजवादी पक्षसुद्धा दलवाईना निवडून येण्यासाठी सोडा, तर पडण्यासाठीसुद्धा तिकिट देण्याची हिंमत दाखवू शकला नाही !
 भारतीय कम्युनिस्ट पक्ष हमीद दलवाईंना हिंदू जातीयवादी आणि अमेरिकन साम्राज्यवादी यांचा हस्तक समजत असे. त्यामुळे 'धर्म ही अफूची गोळी'