पान:वाटचाल (Vatchal).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३६ : वाटचाल

 महात्मा फुले यांचा काळ कितीतरी जुना. जवळजवळ एका शतकाचे अंतर दोघांच्यामध्ये आहे फुले यांच्या काळी हिंदू समाज आजच्या मानाने कितीतरी रूढिप्रिय, अंधश्रद्ध आणि परंपरावादी होता. पण हिंदू समाजाची रचना व जडणघडणच पुष्कळशी विस्कळित आणि विविधतेला वाव देणारी अशी आहे. वेगवेगळ्या जातिजमाती, चालीरीती, परस्परविरोधी भिन्न भिन्न विचार हिंदू समाजात नेहमीच वावरत आले. सुसंघटित, एक ग्रंथाचे प्रामाण्य मानणारा असा हिंदू समाज नव्हता; आजही नाही. विचार मांडण्याच्या बाबतीत खूप मोठे स्वातंत्र्य हिंदू समाजात राहत आले आणि सर्व विचारांना माना डोलवीत त्याच वेळी चिवटपणे आपला परंपरावाद जतन करण्याची हिंदू मनाची शक्तीही फार अफाट आहे. आजही फुले यांचा पुरस्कार व जयजयकार करीत करीत परंपरावाद जतन करण्याची मनोवृत्ती हिंदूंच्यामध्ये दिसते. महात्मा फुल्यांचे पुतळे उभे करणं, आपले महान नेते म्हणून त्यांना लक्ष लक्ष अभिवादने करणे आणि आपले बुरसटलेले मन तसेच जतन करून ठेवणे, हे हिंदूंना अजिबात कठीण वाटत नाही. मुस्लिम समाज यापेक्षा निराळा आहे.
 मुस्लिम समाजातही शिया-सुन्नींच्यासारखे मतभेद आहेत. त्याहून थोडे दूर असणारे अहमदियाही आहेत. पण हा फरक फारसा नाही. एक प्रेषित, एक धर्मग्रंथ यांमुळे आणि जवळपास एक असणाऱ्या कायद्यामुळे मुस्लिम धर्माचे स्वरूप हिंदूंच्या मानाने कितीतरी सुसंघटित आहे, आणि विचारस्वातंत्र्याची त्यांची परंपराही मर्यादित आहे. प्रेषित, कुराण आणि परंपरा यांचा मला परिपूर्ण पाठिंबा आहे, असे मानणाऱ्या दोन माणसांत जितका मतभेद असू शकतो तितकेन विचारस्वातंत्र्य मुस्लिम समाजात असे. एक विचार जाहीर रीतीने मान्य करायचा, तो विचार मांडणारा आपला नेता समजायचा व तरीही परंपरावादी मन जतन करायचे असा दुटप्पीपणा मुस्लिम समाज फारसा पेलू शकत नाही. दलवाई आचार-विचार स्वातंत्र्य यांची परंपरा नसणाऱ्या समाजात उदयाला आले होते, त्यामुळे फुले यांच्यापेक्षा त्यांच्या समोरच्या अडचणींचे स्वरूप उग्र होते, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
 दुसरी बाब अशी आहे की आपला पराभव झाला, आपले राज्य गेले त्या अर्थी आपल्या परंपरेतच काही मूलभूत चूक आहे, असे मानण्यास हिंदू समाज क्रमाने शिकत होता. आपल्या धर्माची, परंपरेची कठोर चिकित्सा करणारे लोक फुले यांच्या शेजारी होते. लोकहितवादी या मंडळींत सर्वांत महत्त्वाचे. आपला पराभव झाला, कारण आपल्या धर्मात, आपल्या परंपरेत, आपल्या समाजरचनेत काहतरी उणिवा आहेत, असे मानण्याकडे हिंदू विचारवंतांचा कल असतो. म्हणून परंपरेच्या चुका दाखवणारा विचारवंत हिंदू समाजात आचारांचा मार्गदर्शक होत