पान:वाटचाल (Vatchal).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हमीद दलवाई


हमीद दलवाई यांच्या निधनाला ३ मे १९७८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ३ मे ला त्यांची प्रथम पुण्यतिथी येत आहे. या योगाचे निमित्त करून मुस्लिम राजकारणाचे विवेचन करणारी दलवाईंची एक जुनी पुस्तिका व अगदी शेवटच्या दिवसांतील त्यांची एक मुलाखत पुन्हा एकत्र करून पुनर्मुद्रित करण्यात येत आहे. दलवाई हे नानाविध कारणांनी आपली कर्मठ धर्मश्रद्धा टिकवून ठेवणाऱ्या मुस्लिम समाजात उदयाला आलेले लोकविलक्षण धडाडीचे आणि आपल्या लोकप्रियतेचा कोणत्याही क्षणी होम करण्यास तयार असलेले असे कार्यकर्ते होते. आधुनिक भारतीय मुस्लिम राजकारणाच्या इतिहासात दलवाईच्या इतका मूलगामी चिंतन करणारा असा निर्भय

विचारवंत दुसरा नाही महात्मा फुले यांच्या काळात त्यांचे कार्य जितके अवघड होते त्यापेक्षा दलवाईंचे काम काही प्रमाणात अधिक कठीण होते. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर दलवाईंना त्यांच्या समाजातून फार मोठा प्रतिसाद कधीच का मिळू शकला नाही यावर थोडासा प्रकाश पडेल. महात्मा फुले आणि हमीद दलवाई यांना समोरासमोर ठेवून विचार करताना माझ्यासमोर त्यांची तुलना करणे हा हेतू नाही. माझा हेतू अगदी मर्यादित आहे. आणि तो म्हणजे, मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजात दलवाईंना पाठिंबा मिळण्यास अडचण कोणती आली या बाबीकडे लक्ष वेधणे. तेवढ्या सीमित प्रश्नापुरताच हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे.