पान:वाटचाल (Vatchal).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३२ : वाटचाल

असाल, जर पुरावा आणि सत्य यांच्याशी प्रामाणिक राहणार असाल तर समाजाच्या श्रद्धेशी कुठे तरी भांडण येणारच.
 संशोधन आणि चिकित्सा यांचे श्रद्धा आणि परंपरा यांच्याशी भांडण होणारच. ते टळणारे नाही. श्रद्धेच्या विरुद्ध जाणारा पुरावा विकारवश न होता सत्यजिज्ञासेने तपासून घ्या हे म्हणणे समूहमन सहज कबूल करणार नाही. आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत अशी आहे की, मी ' हा माझ्या श्रद्धेच्या व हितसंबंधांच्या विरोधी जातो म्हणून मान्य करणार नाही,' असेही कुणी स्पष्टपणे कबूल करणार नाही. संशोधनाचा आव आणूनच परंपरेच्या रक्षणार्थ युक्तिवादाची फौज उभी राहते. ढेरे यांची इच्छा असो वा नसो, त्यांना वादाच्या धुमाळीत उभे राहणे भाग आहे. एक पर्याय आहे तो म्हणजे संशोधन थांबविणे. पण हा पर्याय ढेरे यांनी ठरविले तरी त्यांना अमलात आणणे शक्य नाही.
 शोधणे, संगती लावणे आणि हे करताना तहानभूक विसरणे, मानापमान विसरणे, प्रकृतीचे स्वास्थ्यही विसरणे आणि काही हाती लागले की त्या धुंदीत व आनंदात तल्लीन होणे हा ढेरे यांचा प्राणभूत स्वभाव आहे. त्याशिवाय ते जगूच शकणार नाहीत. म्हणून संशोधन थांबविणे शक्य नाही. मग दर वेळी नव्या रणमैदानात आपण उभे आहोत असा प्रत्यय येणे यालाही पर्याय नाही. कुणाशी भांडू न इच्छिणाऱ्या सोशिक माणसावर नेहमीच भांडणे भाग आहे अशा जागी थांबण्याची पाळी यावी, यात दोष असला तर परमेश्वराचा आहे आणि लाभ आम्हा सर्वांचा आहे. पांडुरंगाने ढेरे यांच्यासारख्या चार-दोन चुका दर पिढीला केल्या पाहिजेत असे मी मानतो.
 ढेरे हे माझ्या पिढीतले प्राचीन मराठी वाङमयाचे व संस्कृतीचे अद्वितीय आणि असामान्य संशोधक आहेत. त्यांच्या बरोबरीचे नाव माझ्या पिढीत नाही. आता ही इतकी निर्विवाद गोष्ट आहे की त्यावर कुणी वाद करणार नाही. पण याचा अर्थ ढेरे सांगतात ती प्रत्येक बाब सर्वांना प्रमाणच मानली पाहिजे, असा नाही. ढेरे स्वतःही तसे मानीत नाहीत. संशोधनात मतभेद असतातच, पण निदान संशोधकांनी शास्त्राची शिस्त पाळून सभ्यपणे ते मांडावेत, ही अपेक्षा असते. नवा पुरावा उपलब्ध झाला तर संशोधकालाच आपली जुनी मते बदलून घ्यावी लागतात. ढेरे यांनाही ते करावे लागते. आपण आपल्या विरोधी उभे राहणे त्याला धैर्य लागते. ते ढेरे यांच्याजवळ भरपूर आहे.
 ढेरे यांचे हे मत बरोबर की ते मत बरोबर, यावर मतभेद होण्याचा संभव आहे. पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीबाबत जो वाद चालू आहे, त्यात ढेरे यांची बाज बरोबर आहे, असे मी मानतो. इतर कुणाला हे पटणार नाही. संशोधकांचे मूल्यमापन करताना हा मुद्दा गौण असतो. एखादे मत, एखादी भूमिका आपणास पटते की