पान:वाटचाल (Vatchal).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डॉ. रा. चिं. ढेरे : १३१

ओलांडून ते इकडेतिकडे फारसे जात नाहीत. या आपल्या मर्यादेतसुद्धा पुरावा व त्यावरून निघणारी अनुमाने याबाहेर जाऊन मीमांसा करण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. महानुभावाचे उत्तरकालीन ग्रंथ आपले दर्शन न्यायदर्शनाचा भाग म्हणून मानतात. ढेरे याची अचूकपणे नोंद घेतात. आपण न्यायदर्शनाचा भाग आहो, ही महानुभावांची भूमिका वाटते तेवढी उत्तरकालीन नाही, याची नोंद करतात आणि थांबतात. प्राधान्याने शैव असणारे न्यायदर्शन संपूर्णपणे वैष्णव असणान्या महानुभावांनी स्वतःचा गट म्हणून मान्य का करावे अगर दर्शनांना आपले पूर्वसूरी नोंदविण्याची गरज का भासावी, या चर्चेत ते जात नाहीत. आपली मर्यादा पुराव्यांची जुळवणी करणे, सामान्यपणे दुर्लक्षित राहिलेल्या अर्थपूर्ण पुराव्यांकडे लक्ष वेधणे व त्यामुळे जी नवी संगती उपलब्ध होईल त्यावर प्रकाश टाकणे इतकीच आहे, असे ते मानतात.
 ढेरे असे या मर्यादेत का वागतात, याविषयी माझी काही मते आहेत. ही मते खरी की खोटी हे सांगता येत नाही. त्यांच्या मनाचा कल अभ्यास करणे, पुरावा शोधणे, याकडे आहे. मीमांसा निरनिराळ्या वादांच्याकडे जाते व नेते. हे वाद आणि आग्रह ढेरे यांना टाळावयाचे असतात. त्यांचा कल हा वाद टाळण्याकडे असल्यामुळे मीमांसा टाळण्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे, अशी माझी समजूत आहे. ही समजूत खरी की खोटी, हे कोण सांगणार ? स्वतः ढेरे यांनाही हे सांगता येणार नाही. कारण आपल्या मनाचे कल अमुक प्रकारचे का असावेत, याविषयी आपण स्वत: केलेले स्पष्टीकरणसुद्धा बरोबर असेलच, याची खात्री देता येत नाही.
 ढेरे वाद-विवाद, भांडणे यांच्यापासून दूर राहू इच्छितात. पण त्यांची ही इच्छा फलद्रूप होण्याचा संभव फार कमी आहे. तुम्हाला एक पुरावा दिसतो. या पुराव्याकडे आजवर लक्ष गेलेले नसते. तुम्ही तो पुरावा समोर ठेवता, त्याचा अर्थ सांगता. इतिहासाची खरी अडचण या ठिकाणी असते. इतिहास संपूर्णपणे मृत नसतो. तो अर्धा बेशुद्ध व अर्धा जिवंत असतो. तुमचा पुरावा प्रांताचा अभिमान, धर्माचा अभिमान, जातीचा अभिमान यांच्याविरोधी जाऊ लागला की भांडण सुरू होणारच. एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दनस्वामी यांना मोक्षोपदेश करणारा कुणी मुसलमान परंपरेतला माणूस आहे, असे ढेरे सांगणार व 'पुरावा बरोबर आहे की नाही हे निर्विकारपणे तपासा' असे आवाहन करणार. वारकऱ्यांना व हिंदूधर्माभिमानी मंडळींना या मुद्दयावर निर्विकार राहणे शक्यच नसते. तुम्ही जर महानुभाव पंथ- प्रवर्तक चक्रधर आणि मुकुंदराजांचे आजेगुरू हरिनाथ या दोन्ही व्यक्ती वेगळया नसून, तो एकच माणूस आहे, असे म्हणणार असाल तर महानुभव धर्माचे अभिमानी व मुकुंदराजांचेही अभिमानी गप्प बसून ते कसे मान्य करतील ? पंढरीच्या विठोवाबावतने वादळ असेच घोंघावत उठले. तुम्ही संशोधन करणार