पान:वाटचाल (Vatchal).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३० : वाटचाल

भरली ? एम. ए. वर पाणी सोडून देऊन त्यांनी त्या पदवीचा नाद कायमचा का सोडला, याची सर्व माहिती मला आहे, पण ती सर्व हकिकत ऐकूनही माझे हे मत आहे की ढेरे यांनी संतापाने पदवी सोडून दिली. ज्यांनी त्यांच्यासाठी प्राध्यापकाच्या जागा धरून ठेवल्या, त्यांना थोडेफार दुःख झाले हे खरे, पण आज असे वाटते की चला, झाले ते फार वाईट झाले नाही. ढेरे यांनी एम. ए. सोडली, पण विद्यापीठाने त्यांना विशेष संधी देऊन पीएच्. डी. ची पदवी प्रदान केली. पुढे ते डी. लिट्. ही झाले. प्राध्यापक होऊन ज्ञानाची उपासना विसरण्याच्या जगात, प्राध्यापक न होता ज्ञानमुग्ध जीवन जगण्याचा योग त्यांना आला, हे चांगलेच झाले.
 ढेरे यांचा स्वभाव निर्दोष आहे, असे माझे मत कधीच नव्हते आणि नाही. उलट, त्यांचे बहुतेक सगळे ठळक दोष मला माहीत आहेत आणि त्या दोषांवरसुद्धा मी प्रेम केलेले आहे. आपली बाजू बरोबर असूनसुद्धा तिच्यासाठी भांडणे त्यांना शक्य होत नाही. ढेरे यांच्यासाठी त्यांच्या बाजूने भांडण्यास त्यांचे मित्र सिद्धता करतात आणि ऐन वेळी ढेरे हातपाय गाळून बाजूला होतात. आपल्यावर अन्याय झाला तर घरी बसून कुरकुरावे व सोसावे, पण भांडून आपले म्हणणे बरोबर असले व त्याविरुद्ध उगीचच रान पेटवले गेले तरी आपणास जे सत्य वाटते, त्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याचे सोडून फक्त सोसावे, अशी अकारण सोशिकता ढेरे यांच्याकडे आहे. हा माझ्या मते दोष आहे, पण ढेरे यांच्यात तो आहे. याखेरीज भिडस्तपणा हाही दोष आहे. कुणी तरी येतो, प्रस्तावनेची गळ घालतो. ढेरे भिडस्तपणे होकार देतात. शब्द पाळणे त्यांना शक्य नसते. मग दोष मान्य करावा लागतो. तो ते मान्य करतात. भांडखोर माणूस अशी जर एखाद्याची प्रसिद्धी झाली, तर तो माणूस समोर सज्जनपणे बसला तरी ढेरे अस्वस्थ होतात. पापभीरू, भिडस्त व सोशिक माणसांचे जे दोष असतात, ते सर्व ढेरे यांच्याजवळ आहेत. त्या दोषांचा आम्हा मित्रांना त्रासही होतो, पण जे आहे ते असे आहे, त्याला इलाज नाही.
 जर दोषांचा पसारा इतकाच मर्यादित असता, तरी तो चालला असता. अशा भिडस्त माणसाने फार हळवे व फार मानी तरी नसावे. आमचे मित्र रामचंद्र चिंतामण पुरेसे हळवे आहेत. भरपूर मानी आहेत. फार लवकर घायाळ होतात आणि शिवाय भिडस्त व सोशिक आहेत. असा माणूस दरवेळी आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना, आपल्या मित्रांना आणि स्वतःलाही अन्याय होईल असे वागतो. ढेरे या माणसाचे हे दोषही प्रेम करण्याजोगे वाटावेत, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
 ढेरे यांनी आपल्या कक्षा आखून घेतलेल्या आहेत. प्राचीन मराठी वाङ्मय, त्याच्या अभ्यासातून निर्माण होणारे प्रश्न आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास व त्यातून निर्माण होणारे प्रश्न एवढ्या कक्षेतच ढेरे वावरत असतात. ही मर्यादा