पान:वाटचाल (Vatchal).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डॉ. रा. चिं. ढेरे : १२९

मुक्कामी कुठे तरी इ. स. १९५८-५९ मध्ये माझ्या घराच्या दरवाजात झाली. त्या पहिल्या भेटीच्या वेळी ढेरे अजून पदवीधर झालेले नव्हते. दोन्ही डॉक्टरेट अजून फार दूर होत्या. नुकतेच एक अभ्यासू तरुण म्हणून ते उदयाला येत होते. साधना प्रेसमध्ये प्रूफ-करेक्टर म्हणून पूर्वी ते काम करीत असत. नव्यानेच ती नोकरी सोडून देऊन ते मोकळे झाले व यापुढे मोकळे राहण्याचा विचारच त्यांच्या मनात पक्का बसला होता. मलाही ढेरे यांच्याविषयी जुजबी माहितीपेक्षा अधिक काही माहिती नव्हती आणि ढेरे यांना माझी काही माहिती असण्याचा संभवच नव्हता. कारण ज्या काळातली गोष्ट मी सांगतो आहे, त्या काळात माहिती असावी असे काहीच माझ्याकडे निर्माण झालेले नव्हते.
 या भेटीविषयी माझे स्मरण असे आहे की, मी कुठे तरी बाहेर जाण्यास निघालो होतो. दारातच ढेरे यांची गाठ पडल्यावर दोनचार औपचारिक वाक्ये मी बोललो. ढेरे यांना घरी या म्हणण्याची गरज काही त्या वेळी वाटली नाही. तसे पाहिले, तर मीही पदवीधर नव्हतो, प्राध्यापक नव्हतो. माझ्या नावे कोणते पुस्तक नव्हते. मॅट्रिक अन्ट्रेन्डच्या पगारावर काम करणारा मी एक साधा मास्तर. ढेरे यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली होती आणि त्यांना पारितोषिकेही मिळाली होती. तेव्हा आपल्यापेक्षा मोठा लेखक, न बोलवता घरी आला आहे तर किमान सभ्यतेने मी वागायला काहीच हरकत नव्हती. मैत्री नसेल, पण कोणतेही भांडणही नव्हते. पण हे त्या वेळी झाले नाही. औपचारिक बोलणी आणि दारावरूनच वाटेलावणी इतकेच या वेळी घडले. ढेरे यांच्यावर या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही. कारण त्यापेक्षा अतिशय कडू गोळ्या त्यांनी वर्षानुवर्षे गिळल्या आहेत. त्याचा फारसा परिणाम त्यांच्या मनावर उरत नाही.
 मी आणि ढेरे इ. स. १९६२-६३ ला एम. ए. ला होतो. ते पुणे विद्यापीठात होते व मी मराठवाडा विद्यापीठात होतो. त्यानंतर प्राध्यापक होण्याच्या मानसिक नयारीत मी होतो. एम. ए. झाल्यानंतर ढेरे यांनीही प्राध्यापक व्हावे, ही सर्वांच्यासह माझीही इच्छा होती. हळूहळू मनाने प्राध्यापक होण्यासाठी ढेरेसुद्धा तयार होत होते. या वेळेपर्यंत आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र झालो होतो. ती मैत्री आज अठरा वर्षे सतत चालू आहे, घनिष्ठ होत आहे. हे झाले कसे, हे मी विसरून गेलो ५९ मध्ये तिन्हाईतपणा होता, ६२ मध्ये मैत्री होती. हा बदल क्रमाक्रमानेच भेटताना, बोलताना झालेला असणार, पण तो आठवत नाही. आता उगीच स्मरणाला ताण देण्यात अर्थ नाही. पण ६२ साली आम्ही मित्र होतो हे मात्र खरे.
 ढेरे यांचा परमेश्वरावर विश्वास आहे. ते नास्तिक नाहीत, कधीच नव्हते. तेव्हा असे म्हणणे भाग आहे की देवाने त्यांच्या कुंडलीत एम. ए. होणे लिहिले नव्हते. प्राध्यापक होण्याचा योग नव्हता. ढेरे यांच्या डोक्यात सणक भरली. का