पान:वाटचाल (Vatchal).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यदुनाथजी थत्ते : १२७

शांतपणे,जी बाजू सुरक्षित असते ती तत्त्व म्हणून पत्करण्याचाही आहे. दर ठिकाणी प्रश्न, आपणच आपल्या श्रद्धा आणि विचारांना प्रामाणिक असण्याचा असतो. स्वार्थ आणि सोय यांच्या आवाजापेक्षा ज्यांच्या जीवनात कर्तव्य आणि आपल्या श्रद्धांशी प्रामाणिक राहणे यांना निर्विवाद जास्त महत्त्व असते, त्यांना चारित्र्यवान माणूस असे मी म्हणतो. खरोखरी काही चांगले घडणारे असते ते या चारित्र्यवान माणसांच्याकडून. एक व्रत म्हणून या चारित्र्याची अवधारणा यदुनाथ थत्ते यांनी जन्मभर केली आहे. ही अतिशय कठीण अशी गोष्ट आहे.
 भगवदगीतेत असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते तिथून निष्ठांचा उदय होतो. भावना ही परिनिष्ठित बुद्धीवर अवलंबून असते. विचारांच्या वर आधारलेली भावना आपले लोभस सोज्वळ स्वरूप न सोडता डोळस व जागरूक कशी राहते याचा कुणी अभ्यास करू इच्छित असेल तर त्यांनी यदुनाथांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे, असे मला वाटते.