पान:वाटचाल (Vatchal).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२६ : वाटचाल

करावा. इथपर्यंत ठीक आहे. पण अशी धार्मिक अन्यायाची चौकशी करू नका, असे जर जयप्रकाश म्हणू लागले अगर एस. एम. जोशी समान नागरी कायद्यावर गोड गोड बोलू लागले तर अतिशय स्पष्टपणे आपल्याला त्यांचा निषेधही करावा लागेल. व्यक्तिपूजेच्या आहारी जाऊन विचारांच्या बाबतीत भोंगळपणा करून चालणार नाही. आमचे नेते आदरणीय आहेत. पण हे नेते आदरणीय आहेत याचा अर्थ त्यांच्याकडून आम्ही ध्येयवादाची प्रेरणा घेतो, हा आहे. ध्येयवादावर जर नेते तडजोड करू लागले तर त्यांचाही निषेध करावा लागेल. यदुनाथ थत्ते मला म्हणाले, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. जर ध्येयवाद की माणूस अशी निवड करण्याची वेळ आली तर मी अतिशय स्पष्टपणे मोठयात मोठ्या नेत्याच्या निषेधाला तयार होईन.
 अतिशय निर्मळ आणि स्वच्छ अशी वैचारिक भूमिका हे यदुनाथांचे कायमचे वैशिष्ट्य आहे. स्वच्छ वैचारिक भूमिकेमुळे कोणत्याही आंधळ्या व्यक्तिपूजेचे स्तोम त्यांच्याजवळ नाही, पण वैचारिक भूमिका स्पष्ट आहेत. यामुळे व्यक्तींच्या विषयी निष्कारणच अनादर दाखविण्याचीही त्यांची प्रवृत्ती नाही. एखादी व्यक्ती आणि तिचे व्यक्तिमत्त्व याविषयीचा श्रद्धाभाव आणि आदर वैचारिक दास्य न पत्करता दाखवता येतो. स्थूलमानाने आपली भूमिका ज्यांच्या विरोधी आहे त्यांचेही मान्य असणारे गुण मोकळेपणाने सांगता येतात. स्थूलपणे ज्यांच्या भूमिका आपल्याला मान्य आहेत, त्यांच्याही बाबत जी भूमिका मान्य नाही तिथे मनमोकळा निषेध नोंदवता येतो. व्यक्तीच्या प्रेमापोटी येणारा आंधळेपणा अगर आकसापोटी येणारा आंधळेपणा हे दोन्ही आंधळेपण टाळून विचारांच्या विषयी स्पष्ट पण व्यक्तींच्या विषयी सुजाण अशी भूमिका घेता येते, हे जमणे कठीण आहे. कारण त्यासाठी आपल्या मनात आग्रह आणि अनाग्रह यांचा समतोल असावा लागतो. हा समतोल अतिशय कठीण आहे, पण तो यदुनाथांना साधलेला आहे.
 अजून एका मुद्द्याचा मी जाता जाता उल्लेख करू इच्छितो. या मुद्दयाला चारित्र्य असे म्हणतात. चारित्र्याची रेखीव आणि चपखल अशी व्याख्या मला करता येणार नाही. ती मी करीतही बसणार नाही. चारित्र्य हा शब्द वापरल्याबरोवर जी परंपरेने चालत आलेली कल्पना असते तीही मला या ठिकाणी अभिप्रेत नाही. ब्रह्मचारी माणूस विवाहितांच्यापेक्षा अधिक चारित्र्यवान मानावा असे मला मुळीच म्हणायचे नाही. अगदी स्थूलपणे सांगायचे तर माणसाच्या जीवनात सर्वच पातळीवर स्वार्थ आणि कर्तव्य यांचा झगडा चालू असतो. कर्तव्य म्हणून ज्या बाबी आपल्यासमोर असतात त्या आपल्या स्वार्थाला सोईस्कर नसतात. हा प्रश्न नसता शेजारची बाई चोरून पाहण्यापुरता मर्यादित नाही. तो ऑफिसला उशिरा जाण्याचाही आहे. वर्गात न शिकवता बसून राहण्याचाही आहे. अतिशय