पान:वाटचाल (Vatchal).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यदुनाथजी थत्ते : १२५

समाजाविषयी बोलण्याची वेळ आली म्हणजे या सर्व पुरोगामी नेत्यांची जीभ अडखळू लागते, चाचरू लागते. या अडखळण्याची दोन कारणे स्पष्ट आहेत. पहिले कारण व्यावहारिक आहे, राजकीय गरज म्हणून मुस्लिम मतदारांना दुखविण्याची यांची इच्छा नसते.आजतागायत काँग्रेस पक्ष मुस्लिम समाजाची मते मिळतात म्हणून त्यांना दुखवीत नसे. आता जनता पक्षाला याच मार्गाने जाण्याची इच्छा होऊ लागलेली आहे. जनता पक्षातील लोक सुद्धा हळूहळू मुस्लिम प्रश्नांवर काँग्रेसच्या भाषेत बोलू लागलेले आहेत.
 उरलेली मंडळी सोडा, पण एस. एम. जोशींनी मुस्लिम परंपरावाद्यांच्या सुरात सूर मिसळावा, ही गोष्ट दुःखद आहे. मुस्लिम समाजात हमीद दलवाईंनी जी पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू केली या चळवळीला एस. एम. चा नेहमीच पाठिंबा राहिला. कालपर्यंत एस. एम. जोशी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे चाहते आणि पाठीराखे होते. समान नागरी कायद्याबद्दल कालपर्यंत त्यांचा आग्रह होता. हमीद दलवाई यांच्या निधनानिमित्त पुण्यात जी गोकसभा झाली या शोकसभेत बोलताना नानासाहेब गोरे यांनी स्पष्टपणे हे सांगितले होते की, सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या काही अडचणी असतात. त्यामुळे कालपर्यंत जी उत्तरे तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून मिळाली त्यापेक्षा वेगळी उत्तरे आता जनता पक्षाकडून मिळतील अशी फारशी अपेक्षा करू नये. पण हे सांगतानाच नानासाहेबांनी एक मुद्दा स्पष्ट केला होता की मुस्लिम समाजातील सुधारणांच्या बाबत जनता पक्षाचे धोरण काहीही असो, व्यक्तिशः मी मात्र तुमच्याबरोबर येईन. एस. एम. जोशी यांच्याकडून अपेक्षा हीच असते. पण एस. एम. जोशी मुस्लिम प्रश्नांच्याबाबत आता सत्ताधारी पक्षाची सोयिस्कर भाषा बोलू लागलेले आहेत. सगळ्याच पुरोगामी राजकीय नेत्यांची ही अडचण आहे की, त्यांना व्यावहारिक राजकारणाचे ताण नजरेआड करता येत नाहीत.
 पण या व्यावहारिक अडचणींखेरीज दुसरी एक वैचारिक अडचण आहे. आपण मुस्लिम समाजाबाबत जर काहीही प्रतिकूल बोललो तर आपली गणना हिंदुत्ववाद्यांच्यामध्ये होईल आणि या देशातील हिंदू जातीयवादी मुसलमानांच्या विरुद्ध बोललेल्या कोणत्याही वाक्याचा गैरफायदा घेतील याची एक विलक्षण धास्ती या पुरोगामी मंडळींना वाटत असते. म्हणून मी यदुनाथांना म्हणालो, आपल्याला कुठेतरी एक निश्चित भूमिका घेतली पाहिजे. उद्या अशी वेळ येणार आहे की, परंपरावाद्यांचे संरक्षण करण्यासाठी म्हणून अतीव औदार्याच्या पोटी एस. एम. जोशी व जयप्रकाश त्यांच्या बाजूने उभे राहतील. बोहरा समाजाच्या धर्मगुरूंनी आपल्या अनुयायांच्यावर अनिबंध हुकूमशाही गाजवावी आणि त्याची चौकशी करू लागताच बोहरा धर्मगुरूंनी आमच्या धर्मात हस्तक्षेप होतो आहे, म्हणून आक्रोश