पान:वाटचाल (Vatchal).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२४ : वाटचाल

हे असते. तेव्हा गुरुजी हे माझेही श्रद्धास्थान यात वादच नाही, पण सानेगुरुजींच्यावर माझी कितीही श्रद्धा असली तरी त्यामुळे त्यांची जी मते मला पटणार नाहीत त्या मतांचा उघड प्रतिवाद करणे मला भागच होते. सानेगुरुजींच्यासारख्या भावनेच्या अंगाने अधिक झुकलेल्या संतांना सत्याचे दर्शन होण्याला पुष्कळदा अडचण येते, असे मला वाटते. गुरुजींच्यासारखी अती चांगली माणसे, आपल्या चांगुलपणाच्या पोटी काय असावे आणि काय आहे यात नेहमी घोटाळा करतात. प्रश्न सानेगुरुजींच्या 'इस्लामी संस्कृती' या पुस्तकासंबंधी होता. त्या वेळी ते पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले होते. या पुस्तकाविषयी आपले मत यदुनाथांना कसे सांगावे याविषयी मी मनातल्या मनात पुष्कळच बावरून गेलो होतो आणि शेवटी एका झटक्यात मी सांगितले, इस्लामी संस्कृतीचे जे स्वरूप सानेगुरुजी सांगतात ते इतिहास म्हणून खरे नाही. यदुनाथ सौम्यपणे म्हणाले, हे अगदी स्वाभाविक नाही काय? ऐतिहासिक सत्य निर्विकारपणे समजावून सांगणे अगर मांडणे हा गुरुजींचा पिंडच नव्हे. इस्लामी संस्कृती कशी आहे यापेक्षा गुरुजींना ती कशी जाणवला याचेच चित्र त्या पुस्तकात पडलेले असणार.
 म्हणजे मी आता सानेगुरुजींच्या पुस्तकावर जोरकस वाद करावा लागणार या तयारीत होतो तो सगळा आवेग अनाठायीच होता. सानेगुरुजींच्याविषयी कितीही उत्कट श्रद्धा असली तरी गुरुजींच्या संतमनाचा भाबडेपणा व त्यामुळे निर्माण झालेली मर्यादा हे यदुनाथांना पूर्वीच माहिती असावयाचे. आपल्या श्रद्धास्थानाचे सामर्थ्य आणि मर्यादा याचा अतिशय डोळसपणे विचार करणे हे यदुनाथांच्या स्वभावाचे वैशिष्ट्यच आहे. ते फार तर श्रद्धयांच्या मर्यादा क्षम्य का ठरतात याविषयी बोलतील, पण अशा मर्यादा आपल्या श्रद्धास्थानांना नाहीतच असा त्यांचा दावा नसतो. चिकित्सेचे सर्व दरवाजे मोकळे ठेवणारे अनाग्रही मन आणि विचारपूर्वक स्वीकारलेल्या श्रद्धांना आग्रहाने जीवनात राबवणारे मन या दोन्हींचा समन्वय त्यांच्या ठिकाणी झालेला दिसतो. काही काही मुद्दयांबाबत त्यांच्या भूमिका आश्चर्यकारक वाटाव्यात इतक्या स्वच्छ व तर्कशुद्ध असतात. याचे कधी कधी मला फार नवल वाटते.
 परवाच आम्ही आनंदवनातून परतत होतो. सहजगत्या चर्चेतून चर्चा निघाली आणि विषय एस. एम. जोशी आणि जयप्रकाश यांच्याकडे वळला. पुन्हा आम्ही दोघेजण अनपेक्षितपणे श्रद्धास्थानांच्या विषयीच बोलत होतो. सेवादल परिवारात मीही वाढलो आहे, थत्तेही वाढले आहेत, तेव्हा एस. एम. जोशी आणि जयप्रकाश या दोघांच्याहीविषयी आमच्या मनात अतीव श्रद्धा असाव्यात यात काही नवल नाही. पण भारतीय राजकारणातल्या सर्व पुरोगामी आणि सेक्युलर समाजनेत्यांची एक दुबळी जागा आहे. ही दुबळी जागा म्हणजे मुस्लिम समाज ही होय. मुस्लिम