पान:वाटचाल (Vatchal).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यदुनाथजी थत्ते : १२३

पद्धत राहत आली आहे. श्रद्धेने आणि भोळेपणाने एखाद्या बाबीचा स्वीकार ते कधी करणार नाहीत. यामुळे यदुनाथ स्वप्नांच्या राज्यात फारसे विहार करू शकत नाहीत. वास्तवाच्या भूमीवर त्यांचे पाय घट्टपणे रोवलेले असतात. हळवेपणा आणि भाबडेपणा त्यांना फारसा मानवणारा नाही. विज्ञाननिष्ठा हे त्यांच्या जीवनाचे सूत्रच आहे. परंपरावादाचे कोणतेही फार मोठे दडपण त्यांच्या मनावर कधीच नसते. परंपरेविषयीची फार मोठी श्रद्धा व भक्तीच नाही. यामुळे परंपरेच्या कोणत्याही घटकाविरुद्ध बंड करताना त्यांच्या मनाला फारसे क्लेश कधी होणार नाहीत यामुळे परंपरेविरुद्ध बंड करण्यासाठी त्यांना फार आढेवेढेही घ्यावे लागत नाहीत. आणि बंडासाठी फार मोठ्या आवेशाची गरजही लागत नाही. बाजारातून सामान भरून आणावे आणि घरी आल्यावर ज्या सहजतेने पुडीचा दोरा आपण उकलून फेकून देतो तितक्याच सहजतेने गळयातले जानवे कायमचे तोडून टाकणे त्यांना शक्य आहे. एक गोष्ट विचाराला पटली म्हणजे ती पटली. निष्कारण भाबड्या श्रद्धेचे ओझे यदुनाथांच्या मनावर कधीच नसते. जी काही मते आपण बनवणार ती थंड डोक्याने विचारपूर्वक बनवू आणि एकदा मत ठरले म्हणजे तितक्याच शांतपणे त्याची किंमत भोजू अशी त्यांची प्रवृत्ती आहे. यदुनाथांच्या या प्रवृत्तीमुळे सहसा त्यांच्यावर कोणत्याही भावनात्मक आवाहनाचा परिणाम होत नाही. फारसे चिडणे, संतापणे हेही त्यांच्या पिंडात नाही आणि उदास, हाताश होणे हेही त्यांच्याजवळ फारसे नाही.
 सामान्यपणे विज्ञानाचा उपासक तर्ककठोर आणि रूक्ष असतो. त्यांना जीवनातील ऋजुता आणि भावना यांचे माधुर्यच कळत नाही. यदुनाथ थत्ते याला अपवाद आहेत. भावनेच्या सर्वच आविष्कारांचे ते काळजीपूर्वक निरीक्षण करीत असतात. माणसे चुका करतातच. या चुकांच्याकडे क्षमाशीलतेने पाहण्याइतका उदारपणा त्यांच्याजवळ असतो. भावनांचे माधुर्य ते नेमके ओळखतात. लहान मलांना हसतखेळत आणि खेळवीत खेळवीत एखादा विचार सोपा करून कसा सांगता येईल याचे प्रयोग ते करीत असतात. विज्ञाननिष्ठेमुळे यदुनाथांचे जीवन अश्रद्ध झालेले नाही. तर त्यांच्या जीवनातील सर्वच श्रद्धा डोळस झालेल्या आहेत. माणूस केवढाही मोठा असो, त्याची चिकित्सा करायला यदुनाथ कधीच नकार देणार नाहीत. यामुळे व्यक्तिपूजेचे स्तोम न माजवता अखंडपणे चालू असणारे व्यक्तींच्यावरील श्रद्धा, चिकित्सेचा स्वीकार करणारे प्रेम असे मोठे गमतीदार मिश्रण त्यांच्या स्वभावात झालेले आहे.
 सानेगुरुजी हे यदुनाथ थत्ते यांचे एक श्रद्धास्थान, यामुळे सानेगुरुजींच्याविषयी, त्यांच्याशी बोलावे कसे याविषयी, माझ्या मनात बरीच घालमेल चाल होती. सेवादल परिवारात वावरलेल्या सर्वांचेच श्रद्धास्थान कमी-अधिक प्रमाणात सानेगुरुजी