पान:वाटचाल (Vatchal).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२२ : वाटचाल

साधनेची भाषा अतिरेकी झालेली नव्हती. त्या कणखर आणि गंभीर झुंजीचे संपादक नेते यदुनाथ थत्ते होते.
 आणीबाणीच्या विरुद्ध एखादे जोरदार व्याख्यान देऊन अगर सत्याग्रह करून तुरुंगात जाणे थत्ते यांना कठीण मुळीच नव्हते. असे काही त्यांनी केले असते तर त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेत भरच पडली असती. पण सत्याग्रह करून तुरुंगात जाण्याच्या कार्यापेक्षा निर्भयपणे निषेधाच्या आवाजाचे सातत्य टिकवायचे दायित्व यदुनाथांनी स्वीकारले. तुरुंगात जाण्याची दर क्षणी तयारी होतीच, पण तुरुंगात जाण्याच्या उत्साहापेक्षा अखंड निषेध जागविणे हे कमी दीप्तीमान, पण अधिक महत्त्वाचे काम यदुनाथांनी स्वीकारले. त्यांचे सगळे धैर्य आणि सगळा निर्भयपणा, या आणीबाणीच्या कालखंडात उजळून निघाला.
 शरण जाण्याला निमित्तं सापडतातच. एक अतिशय गोंडस निमित्त असे आहे की, आणीबाणी आज ना उद्या संपणार, त्यानंतर नव्या निवडणुका होणार, या नव्या निवडणुकांच्या वेळी आपले प्रचाराचे हत्यार सुरक्षित असले पाहिजे म्हणून वाटेल ती किंमत देऊन आपण फक्त अस्तित्व टिकवून ठेवीत होतो. असे सोयीस्कर स्पष्टीकरण देणे अतिशय सोपे आहे. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा तिच्याविरुद्ध झगडण्याऐवजी शरणागती देऊन अस्तित्व टिकविणे ही काही मोठ्या पुरुषार्थाची बाब नाही तडजोडी करून जगण्याला सोज्वळ निमित्त सांगण्याइतकी काहींची बुद्धी चतुर असते, इतकाच याचा अर्थ. पारतंत्र्याच्या काळात, आज ना उद्या स्वातंत्र्य येईलच, त्या वेळी कारभार चालविण्यासाठी जाणकार नोकरांची गरज लागेल, या भव्य दूरदृष्टीने प्रेरित होऊन आम्ही फक्त अभ्यास करीत राहिलो आणि पुढे शांतपणे नोकरी करीत राहिलो, असे जर कुणी सांगू लागला आणि हे स्वातंत्र्यलढयात भाग न घेण्याचे समर्थन तो वापरू लागला तर फारच कठीण होईल. परिस्थिती बदलत असते ती टिकवून राहण्याची गरज म्हणून शरणागती पत्करणाऱ्यांच्यामुळे नव्हे. परिस्थिती नेहमीच, मोडेल पण वाकणार नाही, या जिद्दीने जे उभे राहतात त्यांच्यामुळे बदलते. यदुनाथांनीच असे म्हटले आहे की, संस्था ध्येयवादासाठी उभ्या करायच्या असतात. कधी वेळ अशी येते की ध्येयवाद जतन करण्यासाठी संस्थांचे अस्तित्व धोक्यात घालावे लागते, अशा निर्णायक प्रसंगी ध्येयवादाशी तडजोड करून संस्था टिकविण्याचे कामच जे पत्करतात त्यांनी पराक्रमावर हक्क सांगू नये.
 या झगडयात यदुनाथ टिकले याचे एक कारण असे आहे की, त्यांच्या जीवनात विचार आणि भावना यांचा समन्वय झालेला आहे. तसे पाहिले तर मुळात यदुनाथ थत्ते हे विज्ञानाचे विद्यार्थी. केवळ महाविद्यालयीन जीवनात ते विज्ञान शिकत होते इतकाच याचा अर्थ नाही. विज्ञान ही त्यांची जीवननिष्ठाच आहे. अतिशय वस्तुनिष्ठपणे तावून पारखून एखादी गोष्ट घ्यायची अशी त्यांची नेहमीची