पान:वाटचाल (Vatchal).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यदुनाथजी थत्ते : १२१

नाही. आपण जे विचार बाळगतो ते सोईस्कर म्हणून नसतात. या विचारांची किंमत मोजण्यास तयार असणे हे भोग्य फारच थोडया लोकांच्या वाट्याला येते. यामुळे जीवनात एक चमत्कारिक असा विसंवाद निर्माण झालेला दिसतो. ज्या वेळी एखादा विचार मांडल्यामुळे आपले काहीच नुकसान होणार नसते, त्या वेळी निर्भय वातावरणात माणसे अतिरेकी भाषेत विचार मांडीत असतात. या भाषेच्या दिखावू आक्रस्ताळीपणामुळे ही माणसे लोकप्रियही होतात. पण ही ज्वलज्जहाल मंडळी ज्या वेळी धोका निर्माण होतो त्या वेळी शरणागतीसाठी निमित्त शोधू लागतात. आपल्या मतांची किंमत आपल्याला मोजायची आहे हे ज्यांना सदैव भान असते ती माणसे संपूर्ण मोकळीक असतानाही जबाबदारीनेच बोलतात; आणि, जे बोलावे ते जबाबदारीने हे सूत्रच पत्करलेले असल्यामुळे जेव्हा वेळ येते तेव्हा किंमत मोजायलाही हीच माणसे अग्रभागी राहतात. जगात एकदम जाळ धरून उठणे आणि विजेप्रमाणे कडाडणे याचे महत्त्व फार मानले जाते. कोणत्याही वादळात न विझता तेवत राहाणे याचे महत्त्व ओळखण्याइतका सुजाणपणा अजून समूहाच्या ठिकाणी आलेला नाही.
 गेल्या काही वर्षांत आपण पुन्हा एकदा नव्याने आक्रस्ताळेपणा आणि धैर्य यातील फरक पाहून घेतलेला आहे. लोकशाही होती. लोकशाहीत स्वाभाविक असणारे स्वातंत्र्य होते. त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, राजवट काँग्रेसची होती. काँग्रेसच्या राजवटीवर आणि व्यक्तिशः इंदिरा गांधींच्यावर टीका करीत असताना अधिक अतिरेकी आणि आवेशपूर्ण बोलतो कोण याची जणू चढाओढ लागलेली होती. कर्कश्श सुरात एकेकजण बोलत होता. लोकशाहीच्या काळात 'साधना' ही काँग्रेसविरोधी होती. इंदिरा गांधींचाही 'साधना' ने विरोधच केला. पण निषेधाची आणि विरोधाची भाषा जबाबदारीची व सौम्य होती. आरोळ्या आणि गर्जनांच्यामध्ये साधनेचा आवाज नेहमीच सौम्य आणि मंद असा वाटला. पुढे ज्या वेळी आणीबाणी आली आणि लोकशाही, स्वातंत्र्य गुंडाळून घेतले गेले त्या वेळी गर्जना करणारे आवाज एकाएकी बंद पडलेले दिसले. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी एकेकजण नुसता गप्प बसला नाही, तर शरणागतीची चढाओढ त्यांच्यात सुरू झाली. लोकशाही गंडाळून ठेवणाऱ्या शासनासमोर आरती ओवाळण्यासाठी ही सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने पुढे येत असताना दिसत होती. सिंहाप्रमाणे गर्जना करणारे एकाएकी केविलवाणे स्तुतिपाठक झालेले आहेत असे चित्र दिसत होते. या संघर्षात समाप्त होण्याची तयारी ठेवन शासनाच्याविरुद्ध कणखरपणे उभे राहण्याचे काम फक्त 'साधना' करीत होती. मोडून पडण्याची तयारी ठेवून न वाकता साधना झगडत होती. पण हा कणखर झगडा एका अमानुष दमन यंत्राविरुद्ध चाललेला असतानाही साधनेचा निर्भय असा आवाज शांत व गंभीरच होता. त्याही काळात