पान:वाटचाल (Vatchal).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२० : वाटचाल

आपण कुणीतरी आहोत असे वाटत असते. मानवी मनाचा हा एक स्वाभाविक भाग आहे. आपणही कुणीतरी आहोत या समाधानातच माणूस जगत असतो. आणि ज्याची मते निरनिराळ्या विषयांवर निश्चित असतात. त्यांना तर आपण कुणीतरी आहोत हे विसरता येणेच कठीण असते. सामाजिक, वैचारिक, राजकीय अशा निश्चित निष्ठा यदुनाथांच्याजवळ आहेत, आणि या निष्ठा नुसत्या सांगण्यापुरत्या नाहीत. या निष्ठांचा प्रचार, प्रसार हे आपले जीवनभरचे कार्य आहे ही गोष्ट क्षणभरही ते विसरत नाहीत. मतांच्या बाबत तडजोडी करून आपल्या चाहत्यांची संख्या वाढविणारी काही बोटचेपी माणसे असतात. त्या गटात यदुनाथ बसणार नाहीत. अतिशय जाणीवपूर्वक एखादा माणूस आपलासा करणे आणि त्याला आपल्या वैचारिक निष्ठा देणे हा त्यांचा सततचा प्रयत्न चालू असतो. अशा वेळी नकळत काही घडणे कठीणच असते. पण थत्ते यांना ही अवघड गोष्ट जमलेली आहे. ही एकप्रकारची सिद्धीच आहे. पण आहे त्याला इलाज नाही.
 हे असे का घडते, याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला सारखे असे जाणवते की, माणसांचा विचार करताना आपल्याकडून दोन चुका सातत्याने होत असतात. मागे या चुका होत आलेल्या आहेत आणि याहीपुढे या चुका होत राहाणार आहेत. आपले मत एखाद्याला पटवून देण्याऐवजी आपला आग्रह स्वतःचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी करण्याकडे फार असतो. विजय माझा झाला पाहिजे, प्रभाव माझा पडला पाहिजे, नाव माझे झाले पाहिजे, असा हा मी सर्वत्र प्रभावी असतो. या स्वतःच्या अहंतेला पाजळीत उजळीत निघणे आणि एखाद्या विचाराचा प्रचार करणे या दोन बाबींतील फरक आपल्याला बहुधा ओळखता येत नाही. यदुनाथांनी अतिशय काळजीपूर्वक हा वागण्या-बोलण्यातील मी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याचा परिणाम असा होतो की, बोलणाऱ्याचा मी आणि ऐकणाऱ्याचा मी यांचा फारसा झगडा कधी होत नाही. मी कित्येकदा तर असेही पाहिले आहे की, थत्ते यांचे विचार समोरचा माणूस हळूहळू थत्ते यांना समजावून सांगत असतो. आपण यदुनाथ थत्ते यांना काहीतरी पटवून देण्यात यशस्वी होतो आहोत या उत्साहाने समोरचा माणूस बोलत असतो, आणि प्रायः थत्ते यांचेच विचार तो आपले विचार म्हणून आग्रहाने सांगत असतो. तसे यदुनाथ मोठे संयमी आहेत. आपल्याला हवा तो विचार आपण समोरच्या माणसाच्या गळी उतरविला इतके समाधान त्यांना पुरते. हा माझा विचार मी तुम्हाला पटवून दिला असा आग्रह ते धरीत बसत नाहीत.
 माणसे बोलतात फार. हे बोलत असताना त्यांनी फारसा विचार केलेला असतो असे नाही. मीही अनेकदा असे बोलतो की, मला नोकरीची पर्वा नाही. पण जेव्हा वेळ येईल त्या वेळेला आपली सुरक्षितता धोक्यात घालणे मला जमेलच असे