पान:वाटचाल (Vatchal).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यदुनाथजी थत्ते : ११९

अगर कर्तृत्वाच्या पूर्वज्ञात विकासामुळे काही प्रमाणात आपण प्रभावित झालेले असतो. या संदर्भात आपली व एखाद्या मोठ्या माणसाची भेट झाली म्हणजे आपल्या बऱ्यावाईट प्रतिक्रिया रेखीव व स्पष्ट असतात. यदुनाथ थत्ते यांच्याबाबत हे घडण्याचा संभव फार कमी आहे. आणीबाणीच्या कालखंडात 'साधना'ने शासनाविरुद्ध जो लढा दिला त्यामुळे अलीकडे काही तेजोवलय त्यांच्याभोवती जमा झालेले दिसते. पूर्वी हेही नव्हते. भारदस्त आणि एकदम छाप टाकण्याजोगे त्यांचे व्यक्तिमत्व नाही. यदुनाथ तिशी-पस्तीशीतले तरुण कार्यकर्तेच दिसतात. आपण एका प्रौढ व जाणत्या संपादकाच्या सहवासात आहोत असे न जाणवता आपण एखाद्या समवयस्क तरुण कार्यकर्त्याशी गप्पा मारतो आहोत इतकेच त्यांच्याशी बोलताना जाणवते.
 माझी-त्यांची प्रथम भेट झाली त्या वेळी आचार्य जावडेकर हयात होते. जावडेकर आणि रावसाहेब पटवर्धन यांची नावे शिरोभागी छापल्यानंतर उरलेल्या नावांच्याकडे कुणाचे लक्ष जावे याला काही कारण नाही. 'साधना' हे उग्र आणि भडक नियतकालिक कधीच नव्हते. साधनेची प्रकृती आरंभापासून गंभीर, संयमित व सौम्य अशीच राहिलेली आहे. आणि यदुनाथ थत्ते यांनी प्रयत्नपूर्वक आपला स्वभाव सौम्य बनविला आहे. आपले काम दिपविण्याचे नाही, कुणावर छाप बसविण्याचे नाही. आपले काम भिन्नभिन्न वृत्तीची माणसे स्नेही म्हणून एकत्र आणण्याचे व जमल्यास त्यांचे जीवन उजळण्याचे आहे याची त्यांनी खूणगाठ बांधलेली आहे. अतिशय आग्रही अशी तत्त्वनिष्ठा, अत्यंत सौम्य आणि शीतल प्रकाशात सातत्याने कशी तेवत राहते याबाबत यदुनाथ हा एक नमुना आहे. त्यामुळे त्यांचा परिचय सहज होतो, सहज वाढतो व पूर्ण बांधले गेल्याविना आपण मायापाशात कायमचे जखडले जातो आहोत हे कळतच नाही.
 सहजगत्या एखाद्याची ओळख व्हावी तशी त्यांची ओळख होते. गाडीच्या, बसच्या प्रवासात आपली कुणाशीही ओळख होते; तास-दोन तास गप्पा होतात; नावे-गावे परस्परांना विचारून घेतली जातात; पुनः पुन्हा भेटण्याचे आश्वासनही आपण एकमेकांना देतो; पण प्रवास संपला की ती ओळख संपते. काही दिवसांनी त्यांतले काही आठवणीत शिल्लकसुद्धा राहात नाही. मुद्दाम आठवण ठेवावी असे काहीही घडलेलेही नसते. यदुनाथांची ओळख अशा गाडीतल्या ओळखीसारखी सहजासहजी होऊन जाते. दोन ठिकाणी फरक हा असतो की, यदुनाथ सहज परिचयात येतात, कायमचे बांधून ठेवून जातात, कुणाच्याही जीवनात त्याला नकळत प्रवेश करणे ही अवघड कला आहे. पण यदुनाथांना ती साधलेली आहे.
 आपण कुणीतरी आहोत हे विसरता येणे फार कठीण असते. ज्यांना आपण कणीतरी आहोत असे वाटावे याचे काहीही कारण नसते, त्यांनाही विनाकारणच