पान:वाटचाल (Vatchal).pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यदुनाथजी थत्ते


माझी आणि यदुनाथ थत्ते यांची पहिली भेट केव्हा झाली हे मला आता आठवत नाही. बहुधा इ. स. १९५२-५३ साली सेवादलाच्या निमित्ताने ते वसमत येथे आले होते त्या वेळी त्यांची-माझी प्रथम भेट झाली असावी. वर्ष मला नक्की आठवत नाही, पण या भेटीत श्रीमती दुर्गा भागवतांच्या एका दीर्घ कथेवर आम्ही काही बोललो होतो असे मात्र आठवते. ही सगळीच आठवण झावळ झावळ आणि पुसट पुसट अशी आहे. तिचा नेमकेपणा सांगता येणार नाही. हा परिचय वाढत कसा गेला आणि त्याचे गाढ ममत्वात रूपांतर कसेकसे होत गेले हेही रेखीवपणे सांगता येणार नाही. तरीही हा ऋणानुबंध आता उणापुरा पंचवीस वर्षांचा झाला आहे. यदुनाथ

थत्ते यांचा परिचय झाला कसा आणि तो वाढला कसा याविषयी मलाच नव्हे, तर इतरांनासुद्धा फारसे रेखीवपणे काही सांगता येणार नाही असा माझा अंदाज आहे.
बहुतेक सगळ्या अशा मोठ्या व्यक्ती की ज्यांच्या मी सहवासात व परिचयात आलो त्यांचा-माझा परिचय झाला कसा हे मला आठवते; या सामान्य नियमाला जे काहीजण अपवाद आहेत, त्यांपैकी यदुनाथ थत्ते हे एक. मोठ्या माणसाचा आणि आपला परिचय आठवणीत असतो याला एक कारण असते. बुद्धीचे, कर्तृत्वाचे असे कोणते तरी तेजोवलय या माणसांच्या भोवती असते. आपण कुणातरी मोठया माणसाला भेटतो आहोत याची थोडी पूर्वीच तिथे जाणीव असते. बुद्धीच्या