पान:वाटचाल (Vatchal).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेतु माधवराव पगडी : ११७

मूर्ख सरकार, या कानडी माणसाला परीक्षक नेमले. या बिचाऱ्याला एक अक्षरही न समजता आता दहा-बारा दिवस हाल सहन करीत बसावे लागेल. अशी सहानुभूतीही या परीक्षकांना वाटली. अनुकंपा म्हणून आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीतून हे परीक्षक सेतु माधवरावांना मराठी नाटकही समजावून देत होते आणि पगडी रंगभूमीवरचे नाटक पाहत शेजारच्या या नाटकाचाही आस्वाद घेत होते. आपण ज्याला कानडी समजतो तो मराठीचा जाणता पंडित आहे हे उमगण्यास उरलेल्या दोन परीक्षकांना दोन दिवस वाट पहावी लागली. पश्चिम महाराष्ट्रातील जाणत्यांना मराठवाड्याची ही माहिती इ. स. १९५७ साली उपलब्ध होती.
 सचिवालयातील आसनस्थांना सेतु माधवराव सचिवालयात नको होते. हैद्राबाद राज्याच्या गृहखात्याचा मुख्य सचिव मुंबई राज्याच्या अर्थखात्याचा उपसचिव म्हणून सुद्धा नको होता. सचिवालयात मराठवाड्याचा माणूसच नको, अशी ही प्रेमळ भूमिका सचिवालयाची होती. म्हणून दर्जा सचिवाचा पण हातात सत्ता मात्र काही नाही. तुम्ही सचिवालयाबाहेर गॅझेट तयार करीत बसा, असे सेतु माधवरावांना सांगण्यात आले. हा एक प्रकारे आय. ए. एस. अधिकाऱ्यावर अन्यायच होता. पण सेतु माधवरावांनी वरदान म्हणून ही जागा स्वीकारली. हैद्राबाद राज्य अस्तित्वात असते तरी आणि मुंबई राज्यात न्यायबुद्धी असती तरीही सेतु माधवरावांना प्रशासनात गुरफटून टाकण्यात आले असते. सचिवालयाच्या बाहेर सेतु माधवरावांना काढणे आणि त्यांना सचिवालयात पुन्हा येऊ न देणे यात या चतुर मंडळींना यश आले. सेतु माधवराव मुंबई राज्यात प्रशासनात दीर्घ काळ होते. १९५७ ते १९६८ ही अकरा वर्षे ते मुंबईत आय.ए एस. म्हणून वावरत होते. यातला बहुतेक काळ त्यांनी गॅझेट तयार करण्यात घालविला. पण यात वाईटाचे चांगले फळ हे की, मराठी इतिहास संशोधन अधिक समृद्ध करण्याची क्षमता असणाऱ्या एका अभ्यासकाला इतिहासाला वाहून घेण्याची उसंत मिळाली.
 आता हे सगळेच इतिहासजमा झालेले आहे. जे घडून गेले त्याविषयी उगीचच खंत करण्याची माझी इच्छा नाही. आज माझ्या डोळ्यांसमोर सर्व गुणदोषांच्यानिशी जे सेतु माधवराव उभे आहेत ते महत्त्वाचे आहेत. मराठवाडा मुंबई राज्याला जोडला गेला. नंतर ज्या मराठवाड्यातील दोन-तीन मंडळींना महाराष्ट्रभर प्रतिष्ठा मिळाली आणि ज्या व्यक्तींच्यामुळे मराठवाड्याकडे एकदम आदराने पाहण्याची गरज सर्वांना निर्माण झाली, अशा मंडळीत सेतु माधवराव हे वयाने सर्वांत ज्येष्ठ असे आहेत. मराठवाड्याचा मान उजळ करणाऱ्या या मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्षाला माझे अभिवादन. सेतु माधवराव पगडी हे अभिवादन प्रेमाने स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.
 वा...८