पान:वाटचाल (Vatchal).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११६ : वाटचाल

आपल्यासमोर उपलब्ध नाही. पहिल्या बाजीरावांच्या कार्याची तपशीलवार व बारकाईने पाहणी करणारा ग्रंथ मराठीतच काय पण इंग्रजीतसुद्धा उपलब्ध नाही. सगळे विवेचन अंदाजानेच चालले आहे. रियासतकार सरदेसाई आणि त्यानंतर अगदी अलीकडचे दीक्षितांचे चरित्र इतक्यावरच आपल्याला काम भागवावे लागते. या निमित्ताने श्री. सेतु माधवरावांना अशी विनंती करीन की, त्यांनी आता आपल्या उतारवयातील मोठा ग्रंथ म्हणून बाजीरावावर लक्ष केंद्रित करावे. सेतु माधवरावांच्या जवळ लिखाणाचा झपाटा मोठा आहे. आणि विषय अभ्यासून तयार आहे. त्यामुळे बाजीरावांचे प्रौढ चरित्र लिहिणे त्यांना मुळीच कठीण नाही. सर्व फारशी साधनांचा जाणकार बाजीरावावर लिहिण्यासाठी आवश्यक आहे. बाजीराव हे आपले दायित्व आहे, हे पगडींनी ओळखले पाहिजे.
 इतिहाससंशोधनाची आवड पगडींच्या जवळ मूळचीच होती. फारशी पांडित्य हेही त्यांनी कमावलेले होते. पण इतकेही जरी असले तरी आज जे लिखाण त्यांच्याकडून झालेले दिसते, ते त्यांच्या हातून झालेच असते असे नाही. चांगल्यातून कधी वाईट निपजते आणि वाईटातून चांगलेही निपजते. जुने हैद्राबाद संस्थान चालू राहिले असते, तर सेतु माधवरावांना एका प्रशासकीय जबाबदारीतून दुसन्या प्रशासकीय जबाबदारीत गुरफटून राहणे भाग पडले असते. मग त्यांना उसंतच मिळाली नसती. हैद्राबाद संस्थानाचे तीन तुकडे उडाले हे चांगलेच झाले. पुष्कळांना हे माहीत नाही की, सेतु माधवराव महाराष्ट्राचे आग्रही पुरस्कर्ते होते. हैद्राबादच्या साहित्य संमेलनात महाराष्ट्राचा ठराव त्यांनी आग्रहाने पुरस्कारलेला होता. मराठवाडा साहित्य परिषदेला एक व्यापक अशा मराठी आंदोलनाचे स्वरूप देण्यात त्यांचा पुढाकार होता. हैद्राबाद संस्थान संपले हे समाजाच्या दृष्टीनेही चांगले झाले, सेतु माधवरावांच्या दृष्टीनेही चांगले झाले. कारण यामुळे ते मुंबईनिवासी झाले प्रकाशनाची साधने त्यांना एकदम उपलब्ध झाली. पाहता पाहता सर्व महाराष्ट्रभर ते नामवंत वक्ते, इतिहासज्ञ आणि सिद्धहस्त लेखक म्हणून स्थिरपद झाले.
 हैद्राबाद राज्य संपले आणि नव्या मुंबई राज्यात मुंबईच्या सचिवालयात सेतु माधवराव दाखल झाले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या एका संमेलनाचा हा अध्यक्ष, मराठीतून अनेक ग्रंथ लिहिलेला हा माणूस याचा पश्चिम महाराष्ट्राला काही पत्ता नव्हता. त्यांचे अधिकृत नाव पी. सेतु माधवराव असे होते. नाटयमहोत्सवात शासनाने परीक्षक म्हणून त्यांची निवड केली. सेतु माधवराव या ठिकाणच्या गमती मोठ्या रंगून सांगतात. उरलेले दोन परीक्षक महाराष्ट्रीय होते. मराठी न येणाऱ्या या कानडी माणसाला शासनाने नेमावे ही गोष्ट उरलेल्या दोन्ही परीक्षकांना खेदाची वाटली. दोन परीक्षक आपापसात बोलत होते. काय