पान:वाटचाल (Vatchal).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११४ : वाटचाल

दिलेल्या संगतीतील शेकडो मुद्दे आपल्याला मान्य असतात, अनेक मुद्दे अमान्य असतात, अनेक बाबतीत शंका असतात. ज्ञानाच्या क्षेत्रात ही चर्चा व मतभेदाचे प्रसंग अखंड चालूच असतात.
 पण सेतु माधवरावांच्यामुळे मोगल-मराठा संघर्षाचा एक फार मोठा पसारा अतिशय तपशिलाने आपल्या डोळ्यांसमोर साकार झाला. फारशीमधील सर्व साधने आणि कागदपत्रे ह्यांचा मराठी कागदपत्रांशी समन्वय लावून मोगल-मराठा संघर्षाचे एवढे तपशीलवार चित्र प्रथमच आपल्यासमोर उलगडत होते. जदुनाथ सरकारांनी शिवाजीचे चरित्र लिहिले ते चरित्र फार प्रसिद्ध आहे. सर्व फारशी साधने जमेला धरून आणि मराठी साधने विचारात घेऊन सेतु माधवरावांनी नव्याने इंग्रजीतून शिवचरित्र लिहिले. जदुनाथ सरकारच्या भाषेचा डौल आणि पल्लेदारपणा सेतु माधवरावांच्या चरित्र लिखाणात नाही. पण हा भाषाविलास सोडला तर असे दिसून येते की, जदुनाथांना समोर असलेला पुरावा डावलण्याची सवय आहे ; स्वतःच्या लहरीखातर पुराव्याचा चुकीचा अर्थ लावण्याची सवय आहे; जी साधने अत्यंत महत्त्वाची आणि विश्वसनीय असे ते नोंदवतील ती साधने डावलून आपणच जी साधने उत्तरकालीन अतएव अविश्वसनीय म्हणून नोंदविलेली आहेत त्यांचा स्वीकार करण्याची सवय आहे. असल्या प्रकारच्या दोषांमुळे एरवी भाषाशैलीमुळे जे चरित्र फार आकर्षक वाटते त्यात अनेक हेत्वाभास दडलेले दिसू लागतात. सेतु माधवरावांच्या चरित्रात नेत्रदीपक भाषा नाही, पण भरपूर, पद्धतशीर अशी बारकाव्याची माहिती आणि पुरावेसिद्ध विवेचनाचा सततचा प्रयास आहे. आज तरी इंग्रजीत सेतु माधवराव पगडी यांच्याइतके, शिवाजीची बारीक सारीक माहिती देणारे दुसरे अद्ययावत चरित्र नाही. डॉ. बाळकृष्णांचे चरित्र आता जुने झालेले आहे.
 सेतु माधवरावांनी केवळ शिवाजी नजरेसमोर ठेवला नाही. त्यांच्या डोळयासमोर सर्व मराठेशाही आहे. शहाजी राजांच्या राज्यापासून दुसऱ्या बाजीरावांच्या पदच्युतीपर्यंतचा सगळा इतिहास म्हणजे सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर आहे. हा मराठेशाहीचा इतिहास नीट समजून घ्यायचा असेल तर बहमनी, आदिलशाही, निजामशाही, हैदरअली व निजाम उलमुल्क आसफजहाँ आणि त्याचे घराणे एकीकडे, मोगल व रजपूत दुसरीकडे आणि युरोपियन सत्ता तिसरीकडे असा दोनशे वर्षांचा भारताचा इतिहास बारकाईने पिंजून काढावा लागतो. यासाठी सर्व साधने बारकाईने पाहावी लागतात. फारशी साधनांचा हा सर्व प्रचंड ढीग कष्टपूर्वक उपसायचा आणि तपासायचा तो महाराष्ट्र आणि मराठे यांच्या प्रेमाखातर आणि इतिहासजिज्ञासेच्या प्रेमाखातर ! म्हणून मी वर असे म्हटले आहे, या फारशी पांडित्याची पार्श्वभूमी महाराष्ट्रप्रेम आहे.