पान:वाटचाल (Vatchal).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेतु माधवराव पगडी : ११३

घेऊन माधव ज्यूलियनांनी आपला फारशी-मराठी कोश रचला. हा कोश मराठी इतिहास संशोधनाचा महत्त्वाचा सहकारी राहिला. पण जी अडचण माधवराव दूर करीत होते ती मराठी कागदपत्रे वाचण्याची होती.
 मराठ्यांच्या इतिहासलेखकाला आवश्यक जोड म्हणून फारशी साधनांच्या भांडारात साक्षात घुसण्याचा उद्योग ज्या मंडळींनी केला त्यांच्यात ग. ह. खरे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले पाहिजे. फारशी कागदपत्रं मुळातून वाचणे आणि त्यांचा मराठी इतिहास-संशोधकांना वापर करता यावा म्हणन काळजीपूर्वक मराठी अनुवाद देणे या दृष्टीने ग. ह. खरे यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. पण खरे यांचे परिश्रम फारशी-कागदपत्रे इतक्यापुरतेच मर्यादित राहिले. यापुढील टप्पा सेतु माधवरावांनी गाठलेला आहे. जी साधने प्रकाशित आणि अनुवदित होती त्यांचा मुळापर्यंत जाऊन शोध घेणे, हे काम करीत असताना महत्त्वाची साधने मराठीत अनुवादित करणे हा उद्योग तर पगडींनी केलाच, पण त्या बरोबरच त्यांनी कागदपत्रांचाही शोध घेतला. ही प्रकाशित-अप्रकाशित वृत्तांत आणि पत्रे या दुहेरी स्वरूपाची साधने आणि मराठी साधने यांची संगती लावून मराठेशाहीचा इतिहास पद्धतशीरपणे मांडण्याचाही प्रयत्न त्यांनी केला, सेतु माधवरावांच्या रूपाने आपल्याला असा पहिला मराठी इतिहास-संशोधक दिसतो की जो व्यापक प्रमाणावर मराठी आणि फारशी साधने यांचा समन्वय करून संगती साधील आणि त्या आधारे मराठ्यांचा इतिहास अधिक साकार व संपूर्ण तर करीलच, पण त्या इतिहासाचे तितकेच सप्रमाण भाष्यही देईल.
 सेतु माधवरावांनी हे कार्य नंतरच्या काळात म्हणजे मुंबई राज्यात ते आल्यापासून मोठया नेटाने केले. हे काम त्यांना करता आले याची कारणे आहेत. मी सेतु माधवरावांचा डोळस चाहता आहे, त्यांचा आंधळा भक्त नाही. त्यांनी जे जे लिहिले ते निरपवादपणे बरोबर आहे किंवा निर्विवाद आहे असे मी म्हणणार नाही. पण या साऱ्या अभ्यासाचे एकूण मराठा इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्वही मी नाकारणार नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात वादविवाद आणि मतभेद सारखेच चालू असतात. शिवाजी महाराजांची जन्मतिथी हा असा वादविषय आहे व्यक्तिशः सेतू माधवरावांनी आपले असे मत दिले आहे की, शिवाजी महाराजांचा जन्म बारा मार्च सोळाशे अठ्ठावीसला झाला असावा. सेतु माधवरावांनी शिवाजीविषयी विवेचन करताना, आरंभापासून महाराजांच्या डोळ्यासमोर राज्यनिर्मितीचे ध्येय नव्हते; क्रमाक्रमाने त्यांच्या मनाचा विकास झाला तसतशी स्वराज्याची कल्पना महाराजांच्या डोळ्यांसमोर नक्की झाली; असे मत दिले आहे. ही मते मला मान्य नाहीत. सेतु माधवरावांची मला मान्य नसणारी मते अजूनही पुष्कळ सांगता येतील. पण ज्ञानाच्या क्षेत्रात यापुढे फारसे काही बिघडत नाही त्यांनी नव्याने जुळवून