पान:वाटचाल (Vatchal).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११२ : वाटचाल

नाही. म्हणून फारशी ही मराठेशाहीच्या इतिहासाच्या अभ्यासातील एक महत्त्वाची अडचण ठरलेली आहे.
 बखरींच्यावर अवलंबून राहू नये, कागदपत्रांच्याकडे वळले पाहिजे ही भूमिका अगदी बरोबर आहे. हजारोहजार असणारी मराठी साधने बारकाईने न पाहता मराठ्यांचा इतिहास सांगणे हा तर भ्रमिष्टपणा ठरेलच, पण ही मराठी साधने विचारात न घेता लिहिलेला सतराव्या, अठराव्या शतकाचा भारतीय इतिहासही असमाधानकारक आणि अपुरा राहील. या चित्राला अजून एक बाजू आहे. मराठ्यांना प्रतिस्पर्धी सत्ता म्हणून आदिलशाही आणि मोगल एका कालखंडात होते. नंतर मोगल, त्यांचे सुभेदार निझाम हैदरअली आणि इंग्रज दुसऱ्या कालखंडात होते. डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज अशी युरोपीयन सत्तांची साधने आणि सर्व फारसी साधने लक्षात न येता केवळ मराठी साधनांच्या आधारे आपण भारताचा इतिहास तर लिहूच शकत नाही, पण आपले मराठ्यांच्या इतिहासाचे ज्ञानसुद्धा दुबळे राहते. या सर्व फारशी साधनांच्या बाबत आम्ही भाषांतरांच्यावर अवलंबून आहोत. होता होईतो फारशी साधने वापरायची नाहीत. नाईलाजाने ती वापरावी लागली तर भाषांतरावर संतुष्ट राहायचे ही बाव मराठ्यांच्या इतिहासाच्या अध्ययनालासुद्धा फारशी चांगली नाही. इलियड डाउसन हाच आमचा त्राता राहावा हे काही मोठे भाग्याचे लक्षण नाही.
 ही गोष्ट नीट समजून घेऊन ज्या मंडळींनी हा दुबळेपणा दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांत प्रातिनिधिक म्हणून मी तिघाजणांचा उल्लेख करीन. पहिले ख्यातनाम मराठी कवी माधव ज्यूलियन उर्फ माधवराव पटवर्धन आहेत. माधव ज्यूलियन हे फारशीचे जाणकार होते. ज्या अर्थाने सेतु माधवराव जुनी फारशी, नवी फारशी, साहित्यकांची फारशी, राज्यव्यवहारातील फारशी, भारतातील फारशी, भारताबाहेरील मुख्यत्वे इराणची फारशी असा फारशीचा चौरस अभ्यास करणारे व केलेले पंडित आहेत, तसे माधवरावांचे नाही. माधवराव पटवर्धन हे फारशीचे जाणकार होते, प्राध्यापक होते, एवढेच खरे आहे. फारशीच्या अभ्यासात ते फार रमायला तयार नव्हते. पण त्यांनी फारशी-मराठी कोश रचलेला आहे. आणि तो फार महत्त्वाचा आहे.
 भोवतालच्या मुसलमानी अमलामुळे ही मराठीच फारशीने इतकी प्रभावित झाली आहे की, फारशी-मराठी कोशाशिवाय मराठी साधनेच वाचणे कठीण होऊन जाते. सतराव्या-अठराव्या शतकातील मराठी साधनांचा अर्थ लावण्यासाठी फारसी-मराठी कोश ही एक महत्त्वाची गरज होऊन बसलेली आहे. फारशी शब्द शुद्ध फारशी उच्चारणासह मराठीत येत नाहीत. त्यांचा उच्चार बदलतो आणि मराठीत त्या शब्दांचा अर्थही पुष्कळदा बदलतो. हा सर्व भाग लक्षात घेऊन म्हणजे अर्थसंकोच, अर्थविस्तार आणि अर्थपरिवर्तन तसेच उच्चारपरिवर्तन लक्षात