पान:वाटचाल (Vatchal).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेतु माधवराव पगडी : १११

पीठाच्याही उर्दू विभागात सेतु माधवराव पगडींशी बरोबरीच्या नात्याने बोलू शकेल असा उर्दूचा प्राध्यापक क्वचित आढळेल.
 अलिकडे मराठीच्या प्राध्यापकांची जी अडचण झालेली दिसते तीच उर्दूच्या प्राध्यापकांचीही अडचण आहे. मराठीच्या प्राध्यापकांचे प्रायः संस्कृत कच्चे असते. त्यामुळे संस्कृतात मुरलेल्या मराठीच्या अभ्यासकाशी बोलताना सर्वसामान्य मराठीचा प्राध्यापक दपकून बोलू लागतो. हाच प्रकार उर्दूच्या प्राध्यापकाबाबत आहे. उर्दूच्या सुशिक्षितांना फारशी जवळजवळ येत नाही. उर्दूचा अभ्यासक आणि तो जर फारशीचा ज्ञाता असेल तर सर्व उर्दूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांचा थोडासा भीतीचाच तो भाग असतो. सेतु माधवरावांचे उर्दू पांडित्य या प्रकारचे आहे.
 उर्दू भाषेत वाङमय समीक्षा अतिशय दुबळी आहे. सेतु माधवराव मराठीचे उपासक असल्यामुळे त्यांची रसिकता अतिशय डोळस झालेली आहे. उर्दू कवितेचा प्रसंगी डोळस आस्वाद ज्या कौशल्याने सेतु माधवरावांना घेता येईल त्या कौशल्याने सर्वच उर्दू प्राध्यापकांना तो घेता येईलच असे नाही.
 सेतु माधवरावांनी हा सगळा जो उर्दू, फारशीचा व्यासंग केला त्यांची पार्श्वभूमी उर्दू भाषेतील प्रेमकाव्याची नाही. त्याची पार्श्वभूमी महाराष्ट्राचा अभिमान ही आहे. महाराष्ट्राचा एक अभिमानास्पद असा इतिहास अभ्यासाचा वारसा आहे. महाराष्ट्रात इतिहास-पंडितांची परंपराही फार थोर आहे. पण महाराष्ट्राचे हे इतिहासप्रेम फारशीच्या ठिकाणी येऊन लंगडे पडते. मराठी इतिहास संशोधनात फारशी ही वर्माची आणि दुबळी जागा ठरलेली आहे. मराठ्यांनी आपला इतिहास केवळ बखरींच्या आधारे समजून घेऊ नये. त्यांनी अस्सल कागदपत्रांकडे वळले पाहिजे याची उत्कट जाणीव आमच्या इतिहासअभ्यासकांना राजवाडे यांच्यापासून झाली. त्यामुळे आमचे इतिहाससंशोधक समकालीन कागदपत्रांचे फार मोठे जाणते आणि चिकित्सक झालेले आहेत. पण या इतिहाससंशोधनातील एक अडचण फारशी ही आहे. अगदी आरंभीच्या काळात म्हणजे महंमद बीन कासीमच्या काळात मुस्लीम राजकर्त्यांची भाषा अरबी होती, पण पुढे महमूद गझनीपासून अकबरापर्यंतच्या काळात उत्तरेतील मुस्लीम राजकर्त्यांची राजभाषा प्राय: तुर्की राहिली. मराठ्यांचा अभिमानविषय म्हणजे शिवाजी. शिवाजी आणि पुढची मराठयांची सर्व राजवट म्हणजे स्थूल मानाने भारताच्या इतिहासातील सतरावे आणि अठरावे शतक येते. या कालखंडात मोगलांची राजभाषा फारशी झालेली होती. शिवाजी आणि मराठेशाहीशी संबंध असणारी सर्व साधने फारशीत आहेत. या कालखंडात आदिलशाही आणि कुतुबशाही यांचे सर्व कागदपत्रे फारशीतून आहेत. मोगल, आदिलशहा आणि कुतुबशहा यांची बारकाईने तपशीलवार माहिती असल्याशिवाय मराठ्यांचा साधार तपशीलवार इतिहासच लिहिता येणे शक्य