पान:वाटचाल (Vatchal).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११० : वाटचाल

होणे शक्य नव्हते. सेतु माधवराव फारसीचे पंडित, उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व पण ते निजामच्या राजवटीत मराठीतून लिहीत बसले. वाहत्या जातीय व भारतविरोधी राजकारणात सहभागी होऊन आपला स्वार्थ साधण्याचा मोह त्यांनी कटाक्षाने टाळला.
 सेतू माधवराव मराठीचे उपासक आहेत. मराठ्यांचे आणि शिवाजीचे अभिमानी आहेत. भारतीय राष्ट्रवादाचे ते उपासक आहेत. सरकारी नोकरीत राहून यांपैकी कशावरच लिहिता येणे त्यांना शक्य नव्हते. जे लिहिण्याची मुभा होती आणि जे लिहिणे सोयीचे होते ते त्यांनी लिहिले नाही. जे लिहिणे त्यांना आवडले असते ते त्या वेळी लिहिता येणे शक्य नव्हते. म्हणून सेतु माधवराव अभ्यास करीत बसले. आणि लिहिले ते जुजबी विषयावर ! ज्या मराठीतून ते लिहू इच्छित होते ते लिखाण वाचणारे व छापणारेही दुर्मीळ होते. असा तो काळ होता. परिश्रम करून लिहावे, प्रायः आपलेच पैसे खर्च करून छापावे, पुस्तके कुणी विकत घेईल अशी खोटी आशा न बाळगता ज्यांनी ती वाचावीत असे आपल्याला वाटते, त्यांना ती भेट द्यावीत आणि साऱ्यांचा परिणाम म्हणून शासनात स्वतःविषयीच्या नाराजगीचा सूर चालू राहतो त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम भोगावेत हे सारे बिनतक्रार दीर्घ कालपर्यंत पचविणे त्यांना आवश्यक होते. ही किंमत त्यांनी मोजली, पण ते मराठीचे उपासक राहिले. निजामच्या राजवटीत त्यांनी जे मानसिक क्लेश भोगले त्यातील कडवटपणा विसरून त्या सगळ्या हकिगती विनोद म्हणून तटस्थपणे पाहण्याइतका समजूतदारपणा पुढील काळात त्यांनी अंगिकारला.
 मराठी, मराठ्यांचे राज्य, शिवाजीबाबतचा अभिमान व आत्मीयता ही मूळची बाब. त्यात पुणतांबेकरांच्या सहवासात हा मऱ्हाटपणाचा अभिमान अधिक धारदार झाला. पण या सगळ्या आपल्या अभ्यासाला एक व्यापक बैठक द्यावी लागणार आहे याची जाणीव त्यांना केव्हा तरी याच कालखंडात आलेली असते. फारशी आणि उर्दू याबाबतचा व्यासंग त्यांनी सतत चालू ठेवला. सेतु माधवराव उर्दू भाषेचे आणि फारशीचे जाणते अधिकारी विद्वान आहेत. याचा अर्थ पुष्कळदा आमच्या मित्रमंडळींना कळत नाही. उर्दू भाषेतून अस्खलितपणे वक्तृत्व गाजवता येणे इतकाच या उर्दू पांडित्याचा भाग नसतो. उर्दू भाषेचा व वाङ्मयाचा अगदी आरंभापासून आजतागायत अद्ययावत अभ्यास करणे आणि उर्दू भाषेतील गद्य, पद्य व प्रमुख वाङ्मय नजरेखालून घालणे हाही त्याचा अर्थ असतो. सर्वसाधारणपणे एम. ए. च्या वर्गाचा उर्दू शिकवणारा जो उर्दू भाषेचा अनुभवी व प्रौढ असा जाणता प्राध्यापक असतो, त्याचे उर्दूचे ज्ञान थिटे वाटावे या पद्धतीची उर्दू भाषेविषयीची निष्णातता सेतु माधवरावांच्याजवळ आहे, आणि तसेच फारशीचेही पांडित्य आहे. मराठवाडा विद्यापीठ उर्दू भाषेच्यासाठी फार प्रसिद्ध नाही. पण उस्मानिया विद्या-