पान:वाटचाल (Vatchal).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेतु माधवराव पगडी : १०९

जुन्या निजामी राजवटीत त्यांना मोकळेपणाने अभ्यास लेखन करण्याची संधी उपलब्ध झाली नव्हती, ती इथे मिळाली.
 हैद्राबाद संस्थान हे नानाविध चमत्कारिकपणांनी भरलेले संस्थान होते. या चमत्कारिकपणामध्ये सेतु माधवरावांना विकासाची फारशी संधी उपलब्ध होण्याची शक्यता नव्हती. निजामच्या राजवटीत उर्दू भाषेखेरीज इतर कोणत्याही भाषेच्या विकासाकडे आस्थेने पाहण्याची प्रथा नव्हती. मराठी हा तर रागाचाच भाग असे. सेतु माधवरावांच्या सारख्या सरकारी नोकराने मराठीतून लिहावे ही गोष्ट त्या वातावरणात कुणाला फारशी रुचण्याचा संभव नव्हता. सेतु माधवराव यांनी जर मनात आणले असते तर नानाविध उद्योग आणि उचापती यशस्वी करण्याची संधी त्यांना उपलब्ध होती. त्यांनी कटाक्षाने हा मोह टाळला. ज्या रस्त्याने जाणे सोईचेही नव्हते आणि सुलभही नव्हते त्या रस्त्याने आपले मन आवरून धरीत दीर्घकाळपर्यंत सेतु माधवराव वाटचाल करीत राहिले.
 मी असे अर्धवटच लिहिले तर मला काय म्हणायचे आहे हे नव्या मंडळींच्या नीटसे लक्षात येईल याची खात्री नाही. निजामच्या राज्यात उर्दू ही राजभाषा होती. सेतु माधवराव स्वतः फारशीचे पंडित असल्यामुळे त्यांच्या उर्दूच्या अभ्यासाला शैली आणि डौलदारपणा यांची जोड होती. संस्कृत भाषेचा जाणता आणि अभ्यासक जसा सहजगत्याच प्रौढ व डौलदार मराठीतून बोलतो तसे सेतु माधवरावांच्या उर्दूचे होते. डौलदार, प्रौढ उर्दू भाषेतून रसाळ वक्तृत्व आणि शैलीदार लेखन त्यांना सहजसाध्य होते. असा एखादा भारदस्त उर्दू भाषा बोलणारा चतुर हिंदू माणूस आपल्या राजकारणाला सोयीचा आहे इतके ध्यानात येताच जुन्या हैद्राबाद संस्थानात भारतीय राष्ट्रवादाचा द्रोह करण्याच्या मोबदल्यात एखाद्याच्या जन्माचे कोट कल्याण झाले असते. या मार्गाने जाणे सेतु माधवरावांना शक्य होते. या रस्त्याने जाण्याची आमंत्रणे त्यांना कमी आली नाहीत, पण सेतु माधवरावांनी हा मोह कटाक्षाने टाळला. आजचे जे सत्ताधिकारी आहेत त्यांना सोयीस्कर ठरेल की वर्तणूक ठेवणारा माणूस व्यवहारात नेहमीच यशस्वी होतो. सत्ताधारी बदलले म्हणजे आपल्या भूमिका बदलण्यास प्रत्यवाय नसतो. आय. ए. एस. असूनही पुढच्या काळात सेतु माधवरावांनी राजकीय नेत्यांच्या 'कृपेत राहणे' शक्यतो टाळले. आधीच्या काळातही निजामच्या कृपेत राहणे त्यांनी टाळले.
 राजकीय नेत्यांचा जो लढाऊ पिंड असतो तसा पिंड सेतु माधवरावांचा नाही. राजकारणाच्या धकाधकीत उतरण आपल्याला जमायचे, परवडायचे नाही ही खूणगाठ तरुणपणातच केव्हा तरी त्यांनी बांधून ठेवली, पण तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायचा का नाही इतका निर्णय घेऊ शकता. मनाने राष्ट्रवादी असणाऱ्या माणसाला हैद्राबादच्या राजकारणात उत्साही प्रचारक म्हणून सामील