पान:वाटचाल (Vatchal).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०८ : वाटचाल

झाल्यानंतर कलेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. हैद्राबाद राज्याचे ते शिक्षण खात्याचे संचालकही होते.माझ्या कल्पनेप्रमाणे हैद्राबाद राज्य विभाजनाच्या वेळी ते गृहखात्याचे मुख्य सचिव होते. पुढे ते मुंबई राज्यात काही काळपर्यंत उपसचिव म्हणून होते. आणि दीर्घकाळपर्यंत गॅझेटचे डायरेक्टर आणि साहित्य संस्कृती मंडळाचे चिटणीसही होते. प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ काळ सेतु माधवरावांनी घालविला. प्रशासनाच्या या जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या त्या त्यांनी लीलया सांभाळल्या. कोणत्याही खात्याचे काम पाहताना अमुक एक बाब सेतु माधवरावांना जमली नाही, असे कधी झाले नाही. पण त्यांच्याजवळ प्रशासनात रमणारे मन नव्हते. आपल्या सगळ्या प्रशासकीय कर्तृत्वाकडे ते स्वतःच गप्पांच्या ओघात गमतीदारपणे पाहत असताना आढळून येतात.
 प्रायः सनदी नोकर, विशेषतः जर ते अखिल भारतीय सेवेतील वरिष्ठ सनदी नोकर असतील तर आपल्या कार्यक्षेत्रात पुरेसे वाकबगार आणि तज्ज्ञ असतात, पण या मंडळींचे मनही प्रशासनातच रमलेले असते. ते शरीराने कुठेही असोत, मनाने ऑफिसमध्येच असतात. सेतु माधवराव यापेक्षा अगदी उलट होते. आपल्या खात्याचे काम बिनचूक आणि चोख करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी असे. पण या प्रशासनात त्यांचे मन कधी रमले नाही. आपण प्रशासनात फारसे रमत नसतो. प्रशासनचा भार हाताखालच्या मंडळींच्यावर सोपवून आपण गप्पा मारण्यात रमतो असे ते सांगणार. पण या सांगण्याचा तारतम्याने आपण अर्थ घेतला पाहिजे.कामाचा उरक दांडगा असल्यामुळे आणि ज्या खात्यात ते जातील तेथील सर्व जाणकारी चटकन आत्मसात करण्याची शक्ती असल्यामुळे सेतु माधव राव इतरांना जे काम करण्यास आठ तास लागतील ते चार तासांत उरकणार आणि उरलेले चार तास नानाविध विषयांवर गप्पा मारणार. प्रशासनात न रमलेले, कुशल प्रशासक, असे त्यांचे वर्णन करावे लागेल.
 जुन्या हैद्राबाद संस्थानात असताना सेतु माधवराव प्रथम ललित वाङमयाकडे वळले व काही लघुकथा आणि काही मराठवाड्यातील वाङमयाचे तात्कालिक आढावे असे त्यांच्या आरंभीच्या वाङ्मय सेवेचे स्वरूप राहिले. कवितेची आवड आणि नाटकांची आवड ही त्यांच्याजवळ आरंभापासूनच आहे. एखाद्या विषयाला हात घातला म्हणजे आवश्यक ती सामग्री वेगाने नजरेखालून घालून त्यावर लिहून मोकळे व्हायचे अशी त्यांची त्या वेळी पद्धती असे. सेतु माधवराव मुंबईला आले आणि त्यांच्या लेखनाची गती वाढली. खरे म्हणजे मुंबई राज्याने जर त्यांना काही दिले असेल तर ते इतकेच होते की त्यांना लेखनासाठी निरामय स्वस्थता दिली आणि प्रकाशनाची मनमोकळी संधी त्यांना मिळाली. वाकी त्यांचा अभ्यासाचा पिंड पूर्वीपासून तयारच होता. पण अभ्यासाचा पिंड तयार असला तरी