पान:वाटचाल (Vatchal).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेतु माधवराव पगडी


सेतु माधवराव पगडी यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आणि बहुढंगी आहे. अतिशय रसिक, ज्ञान जिज्ञासू आणि चिकित्सक असे जीवन सत्तर वर्षेपर्यंत ते जगलेले आहेत. ज्या बाबी एखाद्या महाराष्ट्रीय माणसात अतिशय दुर्मीळ आहेत अशा अनेक बाबींचा समन्वय सेतु माधवरावांच्या आयुष्यात झालेला आहे. तसे तांत्रिक दृष्टया पहायचे तर जुन्या निजाम राज्यातील बिदर जिल्ह्यातल्या एका कानडी घराण्यात आणि मध्व संप्रदायाच्या कडक वैष्णव वातावरणात पगडींचा जन्म झाला. मध्व संप्रदायाचा, कट्टर कैतिवैष्णव परंपरेचा अभिनिवेश हा तर त्यांच्या ठिकाणी नाहीच, पण कोणत्याच प्रकारचे कानडीपणही त्यांच्याजवळ नाही. सेतु माधवराव म्हणजे एका

बाजूने इतिहासाचे प्रकांड पंडित आणि दुसऱ्या बाजूने दिलखुलास गप्पागोष्टी करणारे अगदी मराठमोळे गृहस्थ असे आहेत. रसाळ वक्तृत्व आणि तेवढाच विनोदी गप्पांचा भरणा यामुळे मित्रांच्या बैठकीत पांडित्याची महावस्त्रे बाजूला ठेवून हसत-खेळत गप्पा मारीत राहणे हा त्यांचा नित्य सवयीचा भाग झालेला आहे.
म्हटले तर सेतु माधवराव कानडी, पण त्यांची सर्व हयात मराठी भाषेची उपासना करण्यात गेली. आयुष्याचा फार मोठा भाग त्यांनी प्रशासकीय सेवेत वरिष्ठ सनदी नोकर म्हणून घालविला. जुन्या हैद्राबाद राज्यात ते तहसीलदार होते. काही काळपर्यंत डेप्युटी कलेक्टर होते. पोलिस ॲक्शन