पान:वाटचाल (Vatchal).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०६ : वाटचाल

परंपरेने प्राप्त झालेली असते. त्यांचा दिवाळी अंक महाराष्ट्रभर तज्ज्ञांत व जाणकारांत आकर्षण निर्माण करणारा असा असतो. ललित साहित्याबरोबर वैचारिक साहित्यावर भर देणारा दिवाळी अंक म्हणून 'मौजे 'सारख्या कठोर परीक्षणकारांनी या अंकाला मान्यता दिली आहे. मराठवाड्यातून दर्जेदार दिवाळी अंक याच नियतकालिकाचा निघतो. साहित्याची निवड अनंतराव करतात. याविषयी त्यांना स्वतःचेत्र नाक प्रमाण वाटते ! चोखंदळ अभिरुची व निर्दोष रसिकता नसली म्हणजे असा प्रयोग अंगलट येतो. आज अनेक वर्षे हा प्रयोग यशस्वी होत आला यावरून खडकामागे जिवंत पाण्याचे फार मोठे झरे आहेत, असे म्हणण्याला हरकत नाही. मराठवाड्यात जे काही नवे टीकाकार, साहित्यिक आले व बनले त्यांच्यामागे हाच साधासीधा माणूस खंबीर होता. परिणामी वृत्तपत्र व राजकारण यांच्या जोडीला मराठवाडा साहित्य परिषद त्यांच्याच गळ्यात पडली आहे. संस्थांचे जाळे डाव्या-उजव्या खांद्यावर टाकून, मित्रांचा गोतावळा खिशात घालून या माणसाचे हात पुन्हा नाव ओढण्यासाठी रिकामे आहेतच ! चेहऱ्यावरचा निर्घोर सुस्तपणा कायम आहे.
 महाराष्ट्रात दारूबंदी असली तरी त्याचा परिणाम अनंतरावांना शुद्धीवर आणण्यात झाला नाही ! गेली वीस वर्षे एका नशेत घालवल्यासारखी त्यांनी घालवली आहेत. चालुक्यांच्या काळात हत्तींना दारू पाजवून रणमैदानात नेत. अनंतरावांना न पिताच चढलेली असते ! 'नाही, नाही' म्हणत एखाद्या कार्यात ते गुंतून पडतात. त्यांना थकवा आलेला असतो. विश्रांतीची गरज असते. " झटकन हे एक काम संपवून टाकू व मग मोकळ्या मनाने चार-आठ दिवस विश्रांती घेऊ," असे ते ठरवतात व अंगावर पडलेले काम वेगाने आटोपण्यासाठी प्रयत्नाला लागतात. या इच्छेचीच नशा त्यांना चढते. तहानभूक विसरून मग महिना दोन महिने त्यांची धडपड चालू राहते. शेवटी एकदाचे हे काम संपते. त्यात कधी यश कधी अपयश आलेले असते. काम संपताच गेले अनेक दिवस आपले डोके व छाती दुखत होती', 'घरची मंडळी आजारी आहेत,' इत्यादी गौण मुद्दे त्यांना आठवतात ! 'उद्यापासून चार-आठ दिवस पूर्ण विश्रांती' असा निश्चय ठरतो व ते झोपतात. दुसऱ्या दिवशी झोप संपण्याआधी नव्या कामाचे आमंत्रण वाढून आलेले असते. नकार देत अनंतराव त्यात गुरफटतात. दुपारपर्यंत त्यांना नव्या कामाची नशा चढते. ही नशा आता 'क्रॉनिक' झाली आहे. निदान या जन्मी तरी तिच्यावर इलाज नाही.