पान:वाटचाल (Vatchal).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनंतराव भालेराव : १०५

यापेक्षा अधिक काही त्यांना दिले नाही तिच्यावरच त्यांचे गाढ प्रेम आहे ! तिच्याशी निष्ठा ठेवून त्यांची वाटचाल चालू राहते.
 मराठवाडा मागासलेला म्हटला तरी आता नियतकालिके इकडेही खूपच झाली आहेत. दर जिल्ह्यात चारदोन साप्ताहिके आहेत. एक दैनिक आहे. पण 'मराठवाड्यात' जो दर्जा आहे त्याला अजून तरी तोड उत्पन्न झाली नाही. मराठवाड्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांत घडणाऱ्या घडामोडी समजून घ्यायच्या असतील तरीही; आणि या भागातील जनतेच्या ठणकणाऱ्या सर्वच प्रश्नांचे एकमेव व्यासपीठ पाहायचे असेल तरीही; 'मराठवाडा' वाचणे याखेरीज दुसरा मार्ग नाही. सदर नियतकालिकाचे संस्थापक अनंतराव नव्हेत, पण या नियतकालिकाला हे जे प्रातिनिधिक स्वरूप प्राप्त झाले आहे, ते कर्तृत्व मात्र अनंतरावांचेच. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीचे दोन तीन महिने 'मराठवाडया'त जे लिखाण आले ते एकत्र केले तर मराठवाड्यातील दुर्दशेचा व जनतेच्या तक्रारीचा आकडेवार, पुरावेशुद्ध संदर्भ-ग्रंथ तयार करता येईल. निवडणुकीच्या धामधुमीत प्रक्षोभक लिखाण, उपहास, टर उडवणे याला महत्त्व असते. अनंतरावांनी हा माल कमी पडू दिला नाही. पण या निमित्ताने बुद्धीला आवाहन करणारे समतोल लोकशिक्षण साधण्याचा जो प्रचंड प्रयोग त्यांनी केला त्याला इतर भागातील (विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई) एकाही नियतकालिकात तोड सापडणार नाही. ते कर्तृत्व अनंतरावांचेच म्हटले पाहिजे. सर्वपक्षीय जनतेच्या तक्रारींचा चव्हाटा, जनतेच्या इच्छेचे वाहन व तिच्या गरजांचे दर्पण असे नियतकालिक दीर्घकाळ एका राजकीय पक्षाशी निगडित असणाऱ्या कार्यकर्त्याने यशस्वीरीत्या चालवावे, यात अनंतरावांचे सामर्थ्य दडलेले आहे. मधे मधे तर ना. यशवंतरावजींचा औरंगाबादी मुक्काम ही अनंतरावांची तक्रारी सादर करण्याची व मुख्यमंत्र्यांची या तक्रारीना प्रतिसाद देण्याची पर्वणी ठरून गेली होती! ना. यशवंतरावांनी औरंगाबादच्या आपल्या दर व्याख्यानाचा एक दीर्घ भाग यासाठी देण्याची प्रथा पाडली होती.
 अनंत रावांचे वक्तृत्व असेच सरळसोट असते. व्याख्यानात ढंगदार शैली, नर्मविनोद, सूचकता फारशी नसते. बुद्धीला आवाहन देत, पण धारदार आव्हानवजा भाषेत ते बोलतात. श्रोते असले आणि नसले तरी त्यांचे अडत नाही! रिकाम्या सभेसमोर दीड-दोन तास सतत बोलणे ही क्रिया जमण्याइतका मख्खपणा त्यांच्याजवळ आहे ! 'सर्व लोक आपापल्या घरी बसून चिंतनशील मनाने माझे व्याख्यान ऐकत होते !' असे वर्णन करण्याइतका मिस्किलपणा त्यांना उपजत आहे. पण त्यांच्या व्याख्यानाला गर्दी जमतेच. मात्र हा प्रभाव वक्तृत्वाचा नसून निरलसपणे दोन तपे जनतेसाठी झिजणान्या सचोटीचा आहे. जनता कितीही उदासीन असली तरी तिलाही थोडीफार लाज असते ! सचोटीसमोर नमण्याची थोडीफार सवयही