पान:वाटचाल (Vatchal).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०४ : वाटचाल

म्हणजे तो कायमचा अडकतो. अनंतराव त्यांना पटेल त्या दिशेने जात राहतात. त्यांचे शेकडो मित्र ओरडत, कुरकुरत, त्यांना शिव्या मोजीत, पण त्यांनी सांगितलेले ऐकत त्यांच्यामागे फरफटत जातात. सामान्यांत लोकप्रिय असणारा, पण स्वतःची संघटना नसणारा असा हा मराठवाड्यातला सर्वांत महत्त्वाचा लोहचुंबक आहे. त्याचे घर एक अन्नछत्र असल्याप्रमाणे आहे! 'येथे कुणाही माणसाला मोफत आग्रह करून वाढले जाईल,' अशी पाटी त्या घरावर लावायला हरकत नाही. बहुतेक सामाजिक कार्यकर्ते बायकोचे शत्रू नंबर १ असतात. ते मुळी बायकोच्या मुळावर येण्यासाठीच जन्मले असतात. अनंतराव याही जातीचे श्रेष्ठ प्रतिनिधी आहेत ! हा गोतावळा त्यांच्या घरी जेवतो. तिथे येऊन आजारी पडतो. काही सज्जन आजारी असले म्हणजे तिथे येतात ! काही महाभाग जिथे आजारी पडतील तिथे जाग्रणासाठी सपत्निक अनंतराव जातात. असा हा नित्यक्रम सदैव चालू असतो. त्यांचा चेहरा पाहून इतरांना मात्र हे काही जाणवण्याचा संभव नसतो.
 शालेय जीवनात व कॉलेजात अनंतराव स्कॉलर होते म्हणून ऐकतो. पण विद्वत्तेचे तेजोवलय त्यांच्याभोवती फारसे दिसत नाही. तसेच कारण घडल्याशिवाय त्यांचे चिंतन व बुद्धीची चमक प्रकट होत नाही. रिकामटेकड्या खुशालचेंडू गप्पिष्टांचा अड्डा ज्या पातळीवरून सर्व विषय हाताळीत असतो तीच पातळी सामान्यत्वे खाजगी बैठकीत त्यांची असते. विषयातून विषय निघाला म्हणजे मग आपण वाचलेली पुस्तके त्यांनी आधीच वाचली आहेत, आपल्याला आज आलेल्या मौलिक शंका त्यांना पूर्वीच जाणवल्या आहेत हे कळते. मात्र असल्या 'ॲकॅडमिक' चर्चांची त्यांना फारशी आवड नाही. एखादा मित्र बौद्धिक मस्तवालपणा फार करू लागला म्हणजेच फक्त अनंतराव त्याची मस्ती उतरवून देतात. एरवी सगळा मामला 'जनते 'च्या पातळीवरून चाललेला असतो. शिक्षण गुंडाळून देशाची हाक म्हणून ते राजकारणात उतरले. गरीब घरच्या सामान्य कार्यकर्त्याला जो झगडा द्यावा लागतो तो त्यांनाही द्यावा लागला. त्याचे आता पूर्ण घट्टे पडले आहेत. उपेक्षा, कुचंबणा, अपयश यांची व त्यांची मैत्री फार जुनी आहे ! दारिद्रयही अनंतरावांनी खूपच सोसले. विरोधी पक्षात असणान्या गरीब, प्रामाणिक कार्यकर्त्याची ही सार्वत्रिक कहाणी आहे. निजामी कारकीर्दीत जी माणसे फारसा विरोध न करता राजानुकुल राहिली तोच गट व त्यांचे वारसदार आजच्या दिल्लीपतींच्या पक्षात टेसाने मिरवत आहेत ! ज्या वेळी काँग्रेस ही आगीची खाई होती त्या वेळी अनंतराव त्या खाईत होते. आज ज्या वेळी विरोधी पक्ष पराभवाची भुई झाली आहे, त्या वेळी अनंतराव विरोधी पक्षात आहेत ! तीच ताठ मान, तोच बेदरकारपणा, तोच चिवट निगरगट्टपणा. पण या साऱ्या घटनांनी त्यांची रसिकता लोपलेली नाही. पराभवामुळे येणाऱ्या निराशेचा अगर कटुतेचा त्यांच्याजवळ लेशही नाही. ज्या जनतेने दारिद्रय, पराभव, मनस्ताप