पान:वाटचाल (Vatchal).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनंतराव भालेराव : १०३

सौम्य आणि रसिक होऊ लागते. जनतेत ज्या प्रश्नांवर तीव्रता नाही तो प्रश्न कितीही न्याय्य असो, अनंतराव फार वेळ एकाकी धर्मयुद्ध खेळू शकत नाहीत !
 त्यांना मी प्रथम पाहिले त्या वेळी ते 'मराठवाडा'चे उपसंपादक होते. आमच्यासारख्या तरुण लेखकांचे लिखाण ते आग्रहाने मागवीत व न चुकता ‘साभार परत' करीत ! ज्या संपादकाने पुनःपुन्हा माझे लेख साभार परत केले आणि तरीही ज्याच्या आग्रहाखातर मी लिहीत गेलो असे एकमेव संपादक तेच आहेत ! कुठल्या तरी युगातला फाटका कोट त्यांच्या अंगावर होता. पायांत झिजलेल्या वहाणा, मराठाऊ पद्धतीने नेसलेले खादीचे मळकट धोतर असा त्यांचा वेष असे. डोक्यावर टोपी नसणे ही एकच पुरोगामित्वाची दर्शनी खूण शिल्लक होती ! त्याही वेळी त्यांचा चेहरा थोडा बेफिकीर आणि सुस्त दिसे. प्रथमदर्शनी छाप पाडण्याची सामग्री त्यांच्याजवळ फारशी नाही. गेली चौदा वर्षे या रंगरूपात फारसा फरक पडलेला नाही.
 काही माणसेच अशी असतात की, त्यांच्यात फारसा बदल होत नाही. उन्हाने लाल होणे, पावसाने मस्त होणे अगर हिवाने उजळ होणे त्यांच्या बाबतीत संभवत नाही. तुरळक केस पांढरे होऊन ही माणसे तरुणपणीच प्रौढ दिसू लागतात आणि दीर्घकाळ तशीच दिसतात. त्या मंडळींच्या अंगावर कोणताही कपडा घाला, कपड्याचा नूर जातो, यांचा नूर कायम राहतो ! चेहरा पाहून थकवा की हुरूप यांतले काहीच कळत नाही, अशी एक माणसाची जात असते. या जातीचे अनंतराव श्रेष्ठ प्रतिनिधी आहेत. ओबडधोबड व्यक्तिमत्त्वाचा, कारकुनांत सरळ मिसळून जाणारा हा माणूस तळहातावर शिर घेऊन लढलेला क्रांतिकारक वीर आहे ; सहस्रावधी मनांवर प्रभाव गाजविणारा कुशल संपादक आहे; निवडणुकीच्या फडात ‘फडी' भाषण देणारा वक्ता आहे आणि मराठवाड्यातील अत्यंत बुद्धिमान कार्यकर्ता आहे; वाङमयाचा डोळस रसिक आहे ; यावर विश्वास बसणे पुष्कळच कठीण जाते. त्यांचा पिंड गर्दीत धसमुसळेपणाने वागणारा आहे. त्यांच्याबरोबर तिसऱ्या वर्गाचा प्रवास सुरक्षित होतो. भांडणे करून जागा मिळवणे आणि नस ओढीत तासन्तास मित्रमंडळींना हसवीत राहणे त्यांना जमते. मात्र ही बोली-शैली मार्मिक व मुलायम असण्यापेक्षा राठ, कडक आणि दिलखुलास अशी असते. सूचकता, स्मित या बाबींचा त्यांच्याशी फारसा संबंध नाही. अस्सल मराठवाडी शैलीत शिव्या दिल्याप्रमाणे खाजगी बैठकीत ते समजूत घालतात. त्यांच्या नम्र विनंतीला साहेबी आज्ञेचा 'टोन' असतो. हे बदलून जोवर सौम्यपणे कुजबुजणे व मचूळ हसणे ते शिकून घेत नाहीत, तोपर्यत अनंतराव विरोधी पक्षातच राहणार. याला कुणाचाच इलाज नाही !
 पण त्यांची पकड फार घट्ट असते. दमादमाने, पण परिचित माणूस सगळाच्या सगळा ते पचवून टाकतात. त्यांच्या सहवासाच्या जाळ्यात एखादा प्राणी गुरफटला