पान:वाटचाल (Vatchal).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांजवे मास्तर : १०१

होता. विरोधी पक्षनेते कॉ. व्ही. डी. देशपांडे यांनी मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्रास जोडावा अशी उपसूचना मांडली. ही उपसुचना हैद्राबाद विधान सभेने मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाविरुद्ध मतदानाचा कौल देऊन संमत केली. ही घटना घडविण्यात मुख्यतः प्रतोद गांजवे यांनी कोणता भाग घेतला ? त्यांना कोणती प्रलोभने महाराष्ट्रातील कोणत्या मान्यवर नेत्यांनी दाखविली होती? ही सुरस, रमणीय कथा कधीतरी गांजवे मास्तरांनीच सांगितली पाहिजे. चार महिने द्वैभाषिक मुंबई राज्याच्या विधानसभेत मास्तर बसले. नव्या निवडणुका आल्या. गांजवे मास्तरांच्या नावावर वाद नव्हता. त्यांनी पुन्हा विधानसभा लढवावी असा फार आग्रह झाला. पण कुठेतरी मास्तरांना ते बोचत होते. मराठवाडा काँग्रेसपक्षात सन १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेले तिकीट निग्रहपूर्वक नाकारणारे मास्तर हे एकच गृहस्थ मजसमोर आहेत.
 गांजवे निवृत्त झाले. ते फुटून बाहेर का आले नाहीत ? ते लढयाकरिता का नाही तयार झाले ? व्यक्तीचा मोह तर नव्हताच. स्वार्थही त्यांनी कधीच लाथाडला होता. मग ते गप्प का बसले ? काँग्रेसचा मोह त्यांना सुटला नाही एवढेच का ह्या प्रश्नाचे उत्तर ? मला असे वाटते की, संघर्ष करून माणूस कुठेतरी थकतो. हैद्राबाद संपलेले या जन्मी पाहू असे वाटलेही नसेल. ते त्यांनी पाहिले या कृतार्थतेने ते कदाचित थकले असतील!
 गांजवे मास्तरांवर असे मी कितीतरी लिहू शकेन. स्वच्छ आणि उज्ज्वल ध्येयवाद असणाऱ्या विधायक व्यक्तींच्यावर खूपखूप लिहिले पाहिजे, असे सारखे मला वाटते. गांजवे यांच्यावर लिहिण्याचा मोह मला होताच. पण कुठेतरी थांबणे भाग आहे. मी मास्तरांची गणना संत-महात्म्यात करू इच्छिणार नाही. कारण सगळेच संत वास्तववादापासून फार दूर गेलेले असतात, असा माझा अनुभव आहे. ते राजकारणी तर नाहीतच, याविषयी मला शंका नाही. मग हा माणुसकीचा नमुना कोणत्या वर्गात घालावयाचा. मास्तर मी अमुक गटातच बसतो असा आग्रह धरणार नाहीत. खूप चर्चा होऊ देतील. सर्वानुमते जे ठरेल ते मान्य करून शांतपणे उभे राहतील व सहकाऱ्यांनी त्यांचा जो गट ठरविला त्यात ते जाऊन बसतील. 'मला काही काम आहे का हो ?' असे त्यांना विचारावे लागणार नाही. कामे त्यांच्यापुढे धावत येतील आणि मास्तर त्यांत गढून जातील. हजारोंनी विश्वासाने ज्याच्या खांद्यावर मान टाकून निर्धास्त असावे असे ते आहेत आणि इतक्यांना सावरता येईल इतके त्याचे खांदे रुंद आहेत इतके यश या माणसाला पूरे नाही का? वा...७