पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एका पत्रात त्यांनी विकल होऊन लिहिले होते, 'शब्दांना कसंही घडवा. ते अपूर्णच. किती उलटापालट करतो शब्दांची. पण मला जे सांगायचे आहे, ते नेमकेपणाने व्यक्त करायला पूर्णार्थी शब्दच सुचत नाही.' पुढे ब्राऊनिंगचा विवाह बैरेटशी झाला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिने एक पत्र लिहिले. त्यात लिहिले होते, 'काल आपला चर्चमध्ये विवाह झाला. विवाहास अनेक स्त्रिया आपल्या पतींसह उपस्थित होत्या. त्यापैकी कुणाच्यातच मला विवाह करण्यातला माझ्याइतका विश्वास व विवाह करण्याचे प्रबळ कारण, आकर्षण दिसले नाही. बहुधा प्रत्येक स्त्री याच विश्वासावर पुरुषाशी लग्न करत असणार.

 इंग्लंडचा राजा आठवा हेन्री विलासी होता. आपल्या बहिणीच्या नोकराणीवर त्याचं मन बसलं नि ती इंग्लंडची राणी झाली. मन भरलं तसं त्याने तिला तुरुंगात टाकलं. तिच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. इतर अनेक निष्पापांना हेन्रीने केवळ संशयावरून तुरुंगात डांबले तेव्हा राणी एनोबोलिननी राजाला पत्र लिहून बजावलं, 'हे गुणनिधान राजा, माझ्यावर तू न्यायालयात दोषारोप पत्र जरूर दाखल कर, पण तुझा दावा न्याय सम्मत असू दे. माझ्यावर आरोप करणारेच न्यायाधीश असणार नाही अशी मला आशा आहे. माझा खटला जाहीरपणे चालावा इतकीच माझी माफक अपेक्षा आहे.' हे सांगण्याची गरज नाही की तिला नंतर मृत्युदंडाची शिक्षा झाली.

 नेपोलियननी आपली पत्नी जोसेफाईनला घटस्फोट देण्यापूर्वी एक पत्र लिहिलं होतं... 'मी तर संकटातच वाढलो, जगलो. वाईट दिवसांत न घाबरता जगणं आताशा माझी सवय होऊन गेली आहे. हे जोसेफाईन! तू काळजी करू नकोस. सुखी रहा. जर कोणी एकटा, अभागी, कष्टी, दुःखी असेल तर तो फक्त तुझा पती - नेपोलियन.' जगज्जेता नेपोलियन बोनापार्ट इतका हवालदिल होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही.

 मृत्यूशय्येवरून लिहिलेल्या पत्रात जगात श्रेष्ठ समजली जाणारी प्रेमपत्रे टॉलस्टॉयचीच. व्हिक्टर ह्यूगोही याच पठडीतला. 'ला मिजराब' ही जगप्रसिद्ध कादंबरी लिहिणारा. त्यानं आपली प्रेमिका ज्युलिएटला लिहिलेल्या शेवटच्या पत्रात म्हटलं होतं, "प्रिय ज्युलिएट, जर तू माझ्यापूर्वी गेलीस तर मी तुझ्यावरच प्रेम करत राहीन. आणि जर मी तुझ्या अगोदर गेलो तरी मरणानंतरही तुझ्यावरच प्रेम करीत राहीन. तुझा मृत्यू तोच माझाही असेल. - व्हिक्टर.'

 प्रेमपत्रांचा हा खजिना मला रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या जुन्या पुस्तकात

वाचावे असे काही/५०