पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिहिलेली. ही अधिक भावविभोर असतात ना? विवाहानंतर लिहिलेली अर्थात पती-पत्नीने एकमेकांना लिहिलेली. पूर्वी म्हणे आई मुलीला मजकूर सांगायची व मुलगी आपल्या पतीला लिहायची (म्हणजे नक्की कोण, कुणाला, काय लिहायचं ते तेच जाणे!) अशा पत्रांचा मायना असायचा, 'प्राणप्रिय पतीदेव, ईश्वरसाक्ष प्रणाम!' पुरुष काय मायना लिहायचे ते मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 'तेरी भी चूप और मेरी भी'. नव्या संशोधकांना आव्हान! शिवाय तुरुंगातून लिहिलेली प्रेमपत्रे, युद्धभूमीवरून लिहिलेली प्रेमपत्रे तसेच मृत्यूशय्येवरून लिहिलेली काही प्रेमपत्रे या संग्रहात आहेत. ती वाचताना मात्र हृदय पिळवटून निघते खरे! ते काहीही असले तरी प्रेमपत्रे माणसाच्या भाव-भावना, स्वप्ने, आकांक्षा, इच्छांची प्रतिबिंबे असतात तशी गुपितेही. आनंद, आतुरता, आकर्षण, विरह, हुरहुरीने लिहिलेली पत्रे म्हणजे झुरलेल्या शब्दांना आलेला फुलोराच!

 अब्राहम लिंकन यांनी आपली प्रेयसी मेरी ओवेन्सला सन १८३७ मध्ये प्रेमपत्र लिहिलं तेव्हा तो एक साधा लाकूडतोड्याचा मुलगा होता. शिवाय कुरूप. त्यानं प्रेमपत्रात निवेदन केलं होतं, 'जी कोणी स्त्री आपलं जीवन माझ्यात विसर्जित करील तिला मी प्रसन्न ठेवीन. तिच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी प्राणपणाने काळजी घेईन.' इतकं लिहूनही मेरीने लिंकन यांना नाकारले. पुढे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्या दिवशी नक्कीच मेरी ओवेन्सला पश्चात्ताप झाला असणार.

 रशियाचा महान साहित्यिक, विचारवंत लिओ टॉलस्टॉय यांच्या विचारांनी महात्मा गांधीही प्रभावित झाले होते. त्यांची पहिली प्रेयसी होती सोनिया. तिची एक मोठी बहीण होती एलिझाबेथ. घरच्यांना वाटे की टॉलस्टॉयचे तिच्यावर प्रेम आहे. वस्तुतः होते सोनियावर. कारण ती कथाकार होती व तिची पात्रे टॉलस्टॉयला आवडत. तिला एकदा पत्रात टॉलस्टॉयने लिहिले होते, 'प्रेमाची तुझी कल्पना खरी रोमँटिक म्हणायची. तू ज्याच्यावर (माझ्याशिवाय) प्रेम करशील त्याबद्दल मात्र माझ्या मनात ईर्ष्याच राहणार!'

 इंग्रजी कवी ब्राऊनिंगवर कवयित्री बैरेटचे प्रेम होते. ती कविता करून त्या कशा झाल्यात ते विचारण्याच्या बहाण्याने ब्राऊनिंगकडे जात असे. त्या कविता नसायच्या, असायची ती नकळत लिहिलेली प्रेमपत्रेच. ब्राऊनिंग भोळा बिचारा. कविता वाचायचा नि दुरुस्त करून द्यायचा.

 न राहून बैरेटनी शेवटी त्याला विचारलंच, 'तुम्हाला कवितांचा मथितार्थ कळणार तरी केव्हा नि कसा?' मग मात्र दोघे पोट धरून हसत राहिले. मग

वाचावे असे काही/४९