पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येवला (नाशिक) येथे संपन्न मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेनंतर प्रकाशित 'जाहीर खबर' (पृ. १३७) मध्ये ते म्हणतात, "सत्याग्रहाचा त्यांना (सवर्णांना) काहीही उपयोग (परिणाम) होत नसल्याने दलित वर्गाने आपले सामर्थ्य आता विनाकारण मुळीच खर्च करू नये व सत्याग्रहाची मोहीम यापुढे बंद करावी आणि स्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपला समाज विलग समजून त्यांनी आपले संगठन करावे." हे चरित्र म्हणून समाज परिवर्तनासंदर्भात महत्वाचे. अशी सचित्र चरित्रे वाचण्यातून समाज प्रगल्भ होतो अशी माझी धारणा आहे. प्रगल्भता म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागणे. श्रेष्ठ, कनिष्ठतेच्या भ्रामक पारंपरिक कल्पनेतून मुक्त होऊन जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग इ. भेदांच्या पलीकडे जाऊन समानभावाचा सदाचारी व्यवहार करणे. सदर सचित्र चरित्र वाचनाने तुमचे 'जाणिवांचे' जग बदलून तुम्हास जात, धर्म निरपेक्ष मनुष्य बनवते. हे चरित्र सापेक्षतेने महाग आहे, याची मला कल्पना आहे. सोने जगाच्या कोणत्याही बाजारात स्वस्त नसते मिळत. भौतिक महागड्या वस्तू खरेदी करण्याची सवय असलेल्या समाजाने महाग पुस्तके खरेदी करून आपली बौद्धिक श्रीमंती सिद्ध करणे ही खऱ्या प्रगल्भतेची निशाणी होय.

◼◼

वाचावे असे काही/४७