पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होणार नाही." त्या करारी संघर्षामुळेच गेल्या ७० वर्षांच्या स्वातंत्र्य काळात दलित समाजाला मानवाधिकार प्राप्त होऊन ते समाजाच्या मध्य प्रवाहात आले आहेत, याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे.

 बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विदेशात पाठवून केवळ शिकवलेच नाही तर आपल्या संस्थानात नोकरी देऊ केली, संस्थानाच्या विधिमंडळाचे सदस्यत्व बहाल केले, इतकेच नव्हे तर एकदा विदेशातून परतताना डॉ. आंबेडकरांच्या काटकसरीने राहून जमवलेला ग्रंथ संग्रह समुद्रात बुडाला तर महाराजांनी त्याची नुकसान भरपाई केली. डॉ. आंबेडकर लंडनला शिकत असताना राहण्याची अडचण आल्यावर राजर्षी शाहू महाराज आपल्या मित्राला पत्र लिहून डॉ. आंबेडकरांना मदत करण्याची विनंती करतात. या दोन्ही राजांच्या उदार सहाय्यामुळे या देशाचा एक मोठा समाज 'माणूस' झाला, हे सर्व वाचताना अंगावर रोमांच उभे राहते. या सचित्र चरित्रात राजर्षी शाह महाराजांच्या मृत्यूनंतर 'माय डियर युवराज राजाराम' संबोधत छ. राजाराम महाराजांना लिहिलेले पत्र म्हणजे खंदा पाठिराखा गमावल्याचे अरण्यरूदनच होय. ते सर्वांनी मुळातूनच वाचायला हवे. असेच एक हृद्य पत्र या सचित्र चरित्रात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये शिकत असताना पत्नी रमाबाईंना 'प्रिय रामू' संबोधून लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "मी जो त्रास घेत आहे तो माझ्यासाठी नसून सगळ्यांचे कल्याण व्हावे म्हणून" यातूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची परहितदक्ष, उदार वृत्ती सिद्ध होते.

 हे सचित्र चरित्र पाहात वाचत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश, चवदार तळे सत्याग्रह प्रश्नी घेतलेले कष्ट म्हणजे मानव अधिकार प्राप्तीचेच ते रणशिंग होते. राजकीय अधिकार व पदे मिळाल्याशिवाय आम्हाला आमची दु:खे वेशीवर टांगता येणार नाहीत अशी मागणी विविध कमिशन्सपुढे मांडणारे डॉ. आंबेडकर हे खरे द्रष्टे समाजसुधारक होते, याची खात्री हे चरित्र देते. या सर्व कागदपत्रांइतकीच यातील दुर्मीळ छायाचित्रे म्हणजे त्या काळचे चलचित्र होय. भारतीय राज्यघटना लागू होण्यापूर्वीचे हंगामी मंत्रीमंडळ, घटना समिती सदस्यांचे बृहत् सामूहिक छायाचित्र, सुरक्षा समिती छायाचित्र म्हणजे काळाची साक्ष व पुरावे होत.

 या सचित्र चरित्रात डॉ. आंबेडकरांनी प्रसिद्ध केलेली काही निवेदने तत्कालीन समाजाचे कठोर हृदय अधोरेखित करतात. सन १९३५ च्या

वाचावे असे काही/४६