पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यक्तिवादी (Trans Individual) मानत असत. 'मैं न साम्यवादी हूँ, न समाजवादी, सच तो यह है कि आज का समाज व्यक्ति की गुणवत्ता को कुचल देता है।' ज्या समाजात गुणवत्ता जिवंतपणे उपेक्षिली, पायी तुडवली जाते, त्या समाजास पतनोन्मुखच मानायला हवं. आपण मुक्तिबोधांकडे त्यांच्या जिवंतपणी दुर्लक्ष केल्याचं शल्य कृष्णा सोबतींनी या पुस्तकात ठायी ठायी व्यक्त केलंय. आपल्याकडे आपण नारायण सुर्वे, ग्रेस, आरती प्रभू यांची अशीच उपेक्षा केली. आणि सुरेश भटांचीपण! 'ऊपर उठना अपने से नीचे गिरना है।' असं मुक्तिबोध मानत असत.

 'आँखों में आँसू भर लाया
 मेरा जग से द्रोह हुआ पर
 मैं अपने से ही विद्रोही।'

 स्वतःशी विद्रोही, विद्रोह असलेल्याचं कुणाशीच सूत जमत नसतं. म्हणून संवेदनाशील माणसं समाजाशी फटकून जगत असतात. कुटुंब, कबिला, व्यक्ती, नागरिक, जातीयता, समाज समूह, राजकारण, दल, आखाडे कुणाशीच त्याचं देणं-घेणं नसतं. 'मुझे जान, पहचान, मैं मरा नहीं हूँ' म्हणणारा कवी जग सोडून गेलेल्याला पन्नास वर्षे झाली तरी तो आजही आपला वाटतो, आपल्यात असल्याचा भास हेच त्याच्या काव्य, विचारांचं आभासी वैभव!

 मराठी माणूस कडियल (कठोर) स्वभावाचा. मातीचं भांडं! कठोर पण धक्क्यानं तुटणारं, फुटणारं! सच्छिद्र पण एकत्व असलेलं. कृष्णा सोबतींना मराठी माणसाच्या या अगम्यतेचं कुतूहलमिश्रित आश्चर्य या पुस्तकात भरूनही उरलेलं! या कवीचं मोठेपण अधोरेखित करताना डॉ. प्रभाकर माचवे यांनी लिहून ठेवलं आहे, "मी त्यांना मायक्रोव्हस्की, ब्रेख्त, मर्ढेकर, नझरूल यांच्या तोडीचा कवी मानतो. त्यांचा मार्क्सवाद-मानवतावाद एका प्रामाणिक मानवी व्यथेचा शोध घेणाऱ्या व्यक्तीचा विश्वास आहे. तो नुसता पांघरलेला बुरखा नाही किंवा आग्रही, प्रचारकी जाहीरनामा नाही. ते अमर शेख किंवा कवी शिवमंगल सिंह 'सुमन', सुकांत भट्टाचार्य किंवा 'श्री.श्री.' प्रमाणे किंवा नागार्जुन, जोशसारखे 'जनवादी कवी' नाहीत. त्यांच्यात विंदांची बौद्धिकता किंवा विष्णू डे यांची साफसफाई नाही. फैजची सूक्ष्मताही नाही. पण एक विलक्षण अनघडपण खचितच आहे.

◼◼

वाचावे असे काही/१४४