पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भंगार - अशोक जाधव (गोसावी), मनोविकास प्रकाशन, पुणे प्रकाशन - १५ नोव्हेंबर, २०१७, पृ. १८६, किंमत - रु. २००/-



भंगार

 मराठी दलित, वंचित साहित्यात समाजातील उपेक्षितांनी आत्मकथने लिहून मोलाची भर घातली आहे. 'बलुतं', 'उपरा', 'उचल्या', कोल्ह्याट्याचं पोर', 'गबाळ', 'तीन दगडांची चूल' अशा आत्मकथनांनी डोंबारी, कैकाडी, कोल्हाटी, जोशी अशा समाजाचं जगणं चित्रित केलं. भटक्या नि विमुक्त जाती प्रवर्गातील गोसावी समाज यापैकी एक होय. गोसावी समाजाचं जीणं समजावणारी चित्तरकथा म्हणून या समाजात जन्माला आलेल्या, स्वतःच्या उपजत जिद्दीने शिकून शिक्षक झालेल्या अशोक जाधव यांनी 'भंगार' शीर्षकाने आपण भोगलेल्या व्यथा, वेदना शब्दबद्ध केल्या असून मराठी दलित आत्मकथेत त्यामुळे मोलाची भर पडली आहे.

 एन. टी. बी. प्रवर्गात आज गोसावी जमात अंतर्भूत आहे. या समाजाच्या जीवन, परंपरेबद्दल फारसं लिहिलं गेलं नसल्याने आपणास या समाज समूहाबद्दल फारशी माहिती नाही. विश्वकोश, समाज विज्ञान कोशातील या जात समूहाच्या उगम नि विकासाबद्दल फारच त्रोटक माहिती हाती येते. गोसावी, संन्यासी, बैरागी म्हणून परिचित हा जात संप्रदाय मूलतः भटका. त्यात तीर्थाटन नि भिक्षाटन करणारे दोन समुदाय दिसतात. अशोक जाधव यांनी ज्या समुदायाचं, जात पंचायतीचं जगणं चित्रित केलं आहे, तो वर्ग

वाचावे असे काही/१४५