पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हशमत' नावाचे तीन खंड प्रकाशित केले असून हिंदी, उर्दू, पंजाबी भाषेतील समकालीन सुमारे ५० साहित्यिकांचे व्यक्तिमत्त्व शब्दबद्ध करणाऱ्या आठवणी लिहिल्या आहेत. चेहरा, चित्रात्मकता नि चित्र शैली असं त्रिविध सौंदर्य लाभलेलं हे पुस्तक कृष्णा सोबतींच्या 'जिंदगीनामा', 'मित्रो मरजानी', 'डार से बिछुडी', 'ऐ लडकी' सारख्या कादंबऱ्यांप्रमाणेच श्रेष्ठ साहित्यकृती मानली जाते. 'मुक्तिबोध' पुस्तकाचा पोत या सर्वांपेक्षा आगळा, वेगळा म्हणायला हवा. कृष्णा सोबतींनी मुक्तिबोधांच्या कवितांच्या द्वारे त्यांचे विचार, काव्यत्व, चरित्र अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. लेखन शैलीच्या आत्मीयतेमुळे हे पुस्तक हृद्य संवाद बनले आहे.

 मुक्तिबोध : एक व्यक्तित्त्व सही की पहचान' पुस्तक कवी गजानन माधव मुक्तिबोध यांच्या काव्यातून त्यांच्या जीवन, विचार, धारणांचा आस्वादक शोध घेत व्यक्ती म्हणून मुक्तिबोध कसे होते यांचा धांडोळा घेते. विशेष म्हणजे हिंदीचा हा सर्वश्रेष्ठ कवी पण त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या कवितेचं एकही पुस्तक झालं नव्हतं. त्यांच्या कविता कल्पनासारख्या अनेक मासिकांत मात्र प्रकाशित होत राहिल्या. या कवीनं आपल्या काव्यातून सत्याचा वेध घेत मानव जीवन समजावलं-

 'अपनी अटैची (बॅग) सँभाल
 कर रखो,
 जमाना उचक्का (चोर) है।'

 ते अशा ओळींमधून. हा कवी सतत आतल्या आत अस्वस्थ असायचा. कारण होतं घरची गरिबी नि समाजातली बदमाशी. 'एक बेचैन भारतीय आत्मा' म्हणून ते आयुष्यभर कुढत राहिले. जग विचारावर जगावं असं त्यांना वाटत असे. हा आत्ममुग्ध कवी. पण त्याची आत्ममुग्धता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' अशा श्रेणीतली. कृष्णा सोबती यांनी त्याचं मार्मिक वर्णन करत या पुस्तकात मुक्तिबोधांची केलेली मीमांसा वाचनीय ठरते ती सोबतींच्या कवीविषयक आत्मीयतेमुळे 'हे हृदयीचे ते हृदयी' असा हा अद्वैत संवाद बनलेलं पुस्तक परकाया प्रवेशाचं दुर्लभ उदाहरण बनून पुढे येतं.

 कवी मुक्तिबोधांनी आपल्या समग्र काव्यातून मानवी मूल्यांचा आग्रह धरला. मानवीय प्रतिभेचं सौंदर्य म्हणजे त्यांचं विशाल हृदय! 'अनैतिकता नैतिकता की संतान है और अधर्म धर्म का पुत्र है।' सारख्या वाक्यातून ते कठोरपणे मानवीय मूल्य साचं वर्णन करत राहिले. ते स्वतःस परहितकारी

वाचावे असे काही/१४३