पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येते की अमृता प्रीतम आपल्या काव्यातून स्त्री जीवनाच्या विविध भावछटा शब्दबद्ध करीत असतात. आपल्या व्यक्तिगत जीवनात त्या स्व विवेकाच्या कसोटीवर जगल्या. त्यांची ही कविता तुम्हाला सद्सद्विवेक देते म्हणून श्रेष्ठ, जीवनात अनुभवायला आलेले सत्य काळ नि समाजाचा मुलाहिजा न ठेवता निखळपणे मांडणं ही त्यांच्या कवितेची प्रवृत्ती नि प्रकृतीही. सतत नव्या आदर्शाकडे नेण्याचा ध्यास त्यांना भविष्यलक्ष्यी कवयित्रीची संज्ञा बहाल करतो. त्यांच्या या कवितेत पुरुष खलनायक म्हणून न येता मित्र म्हणून येतो, पण त्या मित्राला ती पुरुषत्वाचे जोडे नि वस्त्रे उतरवूनच स्वीकारत असते. ही कविता मानवाच्या नव्या युगांतराचा आग्रह धरणारी म्हणून आधुनिक आहे. ती भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा मेळ सतत घालत असते. ही कविता नियतीचा शोध घेते पण तिच्या अधीन राहण्याचं नाकारते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर द्वंद्व आणि संघर्षाच्या वेळी निर्णायक असतो स्व. अमृता प्रीतम यांनी जीवनाची स्वतःची 'लिटमस टेस्ट' ठरवली होती.

 अमृता प्रीतम यांच्या 'कागद आणि कॅनव्हास' मधील कवितांमध्ये भावनेस बुद्धीची जोड आढळते. स्त्रीबद्दल त्यांचं स्वतःचं असं स्वतंत्र आकलन लक्षात येतं. स्त्रीला केवळ शरीर मानणाऱ्या पुरुषी समाज रचना विचारांशी उभा दावा म्हणजे त्यांची कविता 'पुरुषांनी आजवर पूर्ण स्त्रीशी मीलन अनुभवलेलेच नाही', असा त्याचा दावा आहे. या त्यांच्या वाक्यात स्त्री समानतेचं ब्रीद आहे. हरणारे युधिष्ठिर द्रौपदीस डावावर लावतात तेव्हा 'उसे क्या हक था ऐसा करने का?' विचारणारी द्रौपदी म्हणजे अमृता प्रीतम होय.

 इमरोजनी एक सुंदर पुस्तक संपादित केलं आहे. 'अमृता के प्रेमपत्र' त्याचं नाव. त्यात त्यांनी म्हटले आहे की अमृताची प्रत्येक कविता एक पत्रच असते नि काळ, समाजाशी केलेली तक्रार, शिकायत, गिले-शिकवे भी! अमृता प्रीतमांच्या कवितेने समकालाशी सहमती कधीच स्वीकारली नाही. त्यांना एकच काळ अपेक्षित होता, तो म्हणजे भविष्य! अर्थात स्वप्नातलं सत्य।। म्हणून त्या वर्तमानात कधी रमल्याच नाही. 'हे माझे आयुष्य कुठल्या सरोवराचे पाणी' असा प्रश्न विचारणारी त्यांची कविता तिला असा भास होत असतो की आपल्या गर्भातील काव्य बीजांचे पंख सतत फडफडत आहेत, नव्या आकाश, क्षितिजाचा वेध घेण्यासाठी. म्हणून प्रीतमांची कविता कधीच समाधानाने सुस्कारे सोडत नाही, ती सोडते फक्त

वाचावे असे काही/१०६