पान:वाचन (Vachan).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘परकाया प्रवेश' वाचनच. दुस-याला ओळखता येणं, ही मोठी संवेदन सूचकता होय. वातावरण पाहताच ते शोकाकुल आहे की हर्षोल्हासाने भरलेले आहे, ते शांतता, संगीत, लोकांचं उभं राहणं सर्वांतून उमजत राहतं, ते तुमच्या समाजशीलतेतून येतं. वाचन म्हणजे जीवन सर्वतोपरी समजणं, उमजणं. ते ज्यांना कळलं तो खरा वाचक. “जीवन त्यांना कळले हो' ते हेच.
५.१० वाचन साक्षरता आणि संस्कृती
५.१०.१ वाचन साक्षरता

 साक्षरता म्हणजे लिहिण्या-वाचण्याची क्षमता. वाचन साक्षरता म्हणजे वाचन क्षमता. ती उपजत असत नाही. ती प्रयत्नसाध्य क्षमता असते. एक तर शिकावी लागते. शिवाय वारंवार सराव केल्याने तिच्या गुणवत्तेत वाढ होते. विशेषतः बालवयात मूल जेव्हा घरी, दारी, शाळेत शिकत असते, तेव्हा अक्षर लेखन, उच्चारण, शब्द तयार करणे, गिरविणे, घोकणे, वाचणे, स्मरण करणे यांतून ती क्रमशः विकसित होत असते. शब्दार्थ संग्रह, शब्दप्रयोग, वाक्यरचना इ. कौशल्यांतून वाचन साक्षरता वृद्धिंगत होत वाचन क्षमता आकलन, आशय, तर्क, कल्पना, अन्वय इ.द्वारे प्रौढ, प्रगल्भ होत वाचक हे कौशल्य स्वत:च्या छंदातून व्यासंगापर्यंत नेतो. वाचन व्यासंग ही वाचन साक्षरतेची परिसीमा मानली जात असली, तरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, वाचन साक्षरता ही निरंतर प्रक्रिया आहे. ती आजीवन चालत, विकसित होत राहते. विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पाश्र्वभूमीचा वाचन साक्षरता निर्मिती व विकासात मोठा वाटा असतो. वाचन साक्षरता विकासात विद्याथ्र्यांच्या स्वत:च्या क्षमता, वृत्तींचे जसे योगदान असते तद्वतच ते पालक, शिक्षक, भाऊ-बहीण, मित्र यांचेपण. विद्यार्थी वाचन साक्षर होतो ते नित्यवाचन सरावातून. बालवाङ्मयाची (बडबडगीते, परिकथा, बालकथा इ.) वाचन साक्षरता वाढीत मोठी भूमिका राहते. चौथीपर्यंतची मुले वाचन साक्षर होतात. पुढे ती स्वयंसाक्षर समजली जातात. वर्तमानातील माहिती व तंत्रज्ञान (ICT) साधनांचा या साक्षरतेत मोठा वाटा असून, पूर्वीच्या तुलनेने या युगातील मुले स्वयंप्रयत्नाने वाचन साक्षर होतात. गमतीचा भाग म्हणजे इंटरनेट युगातील वर्तमान विविध अॅप्स, सॉफ्टवेअर्स व संगणक संसाधनांमुळे (Resources) वाचन साक्षरतेसाठी लिहिण्याची गरज उरली नाही.

वाचन/९८