पान:वाचन (Vachan).pdf/98

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


यांचे शब्दलेखन एक असले तरी उच्चारण फरकाने एकाचा अर्थ समजदार' तर दुस-याचा अर्थ 'मूर्ख' होतो, हे इथे लक्षात घ्यावे.
५) तार्किक (Logical)
 प्राथमिक स्तरावर वाचन अध्यापनाच्या या घटकाचा वापर संयमित वा मर्यादित होत असला, केला जात असला तरी शिक्षकाच्या मनात सुप्तपणे याचे भान शाबूत असल्याशिवाय भेद, फरक, तुलना इ. गोष्टी शिकवता येत नाहीत. म्हणून वाचनाच्या क्रमिक विकासात टप्याटप्याने पुढे जाताना क्रम (शब्द, पद, वाक्य इ.) ठरवणे हे शिक्षकास तर्कानेच करावे लागते. त्याचा ठोकताळा नाही, नियम नाही.
५.९.३ वाचन वैविध्य

 वाचनाच्या अशा किती परी असतात म्हणून सांगू? आपणाला पुस्तक वाचता येणे ही शब्द साक्षरतेची परिणती होय; पण वाचनाने येणारे शहाणपण आले म्हणजे काय? तर आपणास माणूस, निसर्ग, भाव, चित्र इ. वाचता येणे. माणसाचा चेहरा बोलका तसे डोळेही. पाहताच माणूस सुखी, दु:खी, उदास, आनंदी असल्याचे कळते. ‘स्वारी आज खुश दिसते ?', चेहरा का काळा पडलाय?' यांसारखे संवाद माणूस वाचनच असतं. कोण कुणाकडे कोणत्या नजरेनं पाहतं ते उभयपक्षी लक्षात येतं, हे असतं भाव वाचन, पाऊस येणार ते ढग पाहताच उमगतं. ते असतं निसर्ग वाचन. आपण चित्र पाहतो नि समजतं. हे समजणं हा चित्र वाचनाचा बोध होय. एखादा माणूस चांगला नाही, असा आपण अभिप्राय देतो. ते त्याचे आपल्या लेखी चरित्र वाचनच असतं. दीर्घ निरीक्षणातून हाती आलेला हा निष्कर्ष निरंतर वाचनाचे प्रत्यंतर नव्हे का? वाचताना आपण दोन शब्दांतील, ओळींतील अर्थ वाचतो (Reading between the lines). हे काय असतं? न लिहिलेलं सूचन कळणं तुमच्या प्रगल्भ वाचनाची निशाणीच असते. संशयित आपण कसा ताडतो? तर्क हेपण अमूर्त वाचनच नव्हे का? देहबोली उमजणे हे हालचालीचे वाचनच असते. 'His eyes are reliable' असं म्हणतो सहज; पण ते वर्षांच्या अभ्यासाचं फळ असतं. मोनालिसाचं हास्य उमगणं नि बुद्धाचा चेहरा, प्रकाश रचना बदलता भाव बदलतो, हे कळणेपण छाया-प्रकाश वाचनच असतं. माणूस इतरांना वाचतो तसा स्वत:सही वाचत, जाणत असतो. ‘आज कसंसं होतंय', 'मन नहीं कर रहा है', ‘इच्छा नाही', ‘उमेद नाही' असं स्वत:बद्दल म्हणणं आत्मवाचनच. अंतरीच्या खुणा अंतर जाणे ते हेच.

वाचन/९७