पान:वाचन (Vachan).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाचताना एकाग्रता ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. त्याशिवाय वाचलेले लक्षात राहणे अवघड होते. वाचनाची गती, प्रतिमिनिट वाचनाची शब्दसंख्या यावर संशोधन झाले आहे. जलद व प्रभावी वाचन व्हायचे तर या सर्वांचे अवधान वाचकांनी बाळगायला हवे. वाचनात महत्त्वाचा अडथळा असतो तो कठीण शब्द, संकल्पनांचा. आकलनपूर्ण वाचन व्हायचे तर अशा शब्दांचे अर्थ, संकल्पनांची फोड करून घेणे फायद्याचे ठरते. मग जे वाचायचे त्याची दिशा, लक्ष्य निश्चित करायला हवे. निर्हेतुक वा निरुद्देश वाचन काय कामाचे? वाचन सामुग्रीतील महत्त्वाचे चर्चेचे, वादविवादाचे, विश्लेषणाचे मुद्दे लक्षात घेऊन केलेले वाचन अंतिमतः फलदायी ठरते. वाचताना संदर्भ, अनुमान इत्यादी बाबीपण तितक्याच महत्त्वाच्या असतात. वाचनात येणारे दृष्टांत, पुरावे यांचेसुद्धा आकलनाच्या दृष्टीने महत्त्व असते. आपण एकाच विषयावर अनेक पुस्तके वाचत असतो. अशा स्थितीत पूर्ववाचन व वर्तमान वाचन (दोन पुस्तकांतील) साम्य स्थळे, भेद स्थळे शोधून तुलना करून स्वत:चे मत तयार करता येणे म्हणजे आपले वाचन प्रौढ, प्रगल्भ, सुजाण झाल्याची खूण समजावी. अशी प्रचिती येणे ही वाचन सार्थक्याची कसोटी वा खूणगाठ मानावी. यासाठी आपले वाचन चतुरस्र असणे आवश्यक असते. वाचन कौशल्यांचा विकास होतो तो अशा सर्वग्राही, सर्वंकष वाचनातूनच. वाचन हे चौकस हवे तसे चतुरस्रही. ते अशासाठी की त्यामुळे आपणाला एका प्रश्न, समस्येचे अनेक पक्ष उमजतात. अशी उमज पडणे म्हणजे तुम्ही अष्टपैलू होणे होय. वैविध्यपूर्ण वाचन वाचकास मर्मग्राही, चोखंदळ बनवत असते. म्हणून वाचनाची विविध कौशल्ये आपण समजून घेऊन ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा.
५.६.१ प्रभावी वाचन

 वाचक अनेक प्रकारचे वाचन करत असतो, तसा तो अनेक स्वरूप, साधनांद्वारे वाचत असतो. माणसाच्या वाचनाच्या कक्षा बहुआयामी असतात. तो पुस्तक, नियतकालिके, वृत्तपत्रे, जाहिराती, संगणक, मोबाइल्स इत्यादींवरील मजकूर वाचतो. ते साहित्य, लेख, समीक्षा, निबंध, वृत्तांत, वर्णन, संशोधन, प्रबंध, प्रकल्प, व्यक्तीलेख अशा स्वरूपाने वैविध्यपूर्ण राहतं. अभ्यास करणारा विद्यार्थी पाठ्यपुस्तके, मार्गदर्शिका, स्वाध्याय, प्रश्नोत्तरे, अशा अंगांनी वाचतो. जे वाचतो त्याची चिकित्सा, चर्चा, पक्षविपक्ष, मूल्यमापन, समीक्षा, विरोधी मत लेखन अशा अंगांनी वाचल्याचा

वाचन/८०