पान:वाचन (Vachan).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजणे सर्वांत महत्त्वाचे. प्रश्न वाचता येण्यापेक्षा उत्तर देता येणे महत्त्वाचे असते. ते आकलन क्षमता आणि कौशल्यावर आधारित असते. म्हणून आज वाचन प्रक्रिया समजून घेणं आवश्यक झालं आहे. वाचन प्रक्रिया विविध टप्प्यांनी पूर्ण होते. त्याची एक रीत आहे. त्यासाठी वाचन कृतिशील असणे महत्त्वाचे. म्हणजे तिच्यात कल्पना, नाद, लय, ताल, हवा तसा आशयही हाती येणे महत्त्वपूर्ण. वाचनातून हाती काही आले नाही, तर ते वाचन व्यर्थ समजावे.
५.५.१ वाचनाचे तीन टप्पे
 वाचन प्रक्रिया तीन टप्पे ओलांडत पूर्ण होते-
१. वाचनपूर्व अनुमान (Preview)
 आपण जे वाचणार आहोत, त्या सामग्रीसंबंधी आपले पूर्वज्ञान, अनुभव यांची संगती पार्श्वभूमी म्हणून महत्त्वाची असते. त्यामुळे लक्ष्य मजकूर समजणे सोपे होते.
२. वाचन कृती (Actin/Activity)
 प्रत्यक्ष वाचनाची कृती करताना अपेक्षित माहिती, ज्ञानाचे दृश्यमान रूप (Visualize form) , पूर्वज्ञानाचे एकात्मीकरण व नवे ज्ञान प्राप्त करण्याची मानसिक तयारी या सर्वांतून तयार होणारे वाचन सामुग्रीसंबंधी स्वत:चे आकलन अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्ञान मिळणे शक्य होते.
३. वाचनोत्तर प्रतिसाद / प्रतिक्रिया (Recalling)
 आपण वाचून जे ज्ञान प्राप्त करतो, त्याचे उपयोजन करणारा प्रतिसाद सकारात्मक / नकारात्मक असणे हे आपल्या अभिरुची, वृत्तीवर अवलंबून असते. एकाच वाचन सामुग्रीच्या आकलनानंतरच्या प्रतिक्रिया भिन्न असू शकतात. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन: स्वाभाविकच म्हणायला हवे. गझल, भजन, लावणीचा श्रोता भिन्न असतो. भक्ती, प्रेम, वात्सल्य, शृंगार, घृणा, आस्वाद इत्यादी भिन्नता त्यातूनच उदयाला येते.
५.६ वाचन कौशल्ये (Reading skills)

 का वाचायचे हे कळल्यावर कसे वाचावे? असा प्रश्न ओघाने येतोच. वाचन ही जर क्रिया, प्रक्रिया पद्धती असेल, तर ती व्यवस्थित, सुनियोजित होण्यासाठी वाचकाने स्वत:मध्ये अशी कौशल्ये निर्माण कशी होतील ते पाहायला हवे. त्यासाठीची पूर्वतयारी, पूर्वपीठिका निश्चित असणे जरुरीचे असते. वाचनासाठी मानसिक तयारी हवी. वेळेचे पूर्वनियोजन हवे.

वाचन/७९