पान:वाचन (Vachan).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  वाचन प्रक्रियेतून ज्ञानाचे जे क्षितिज रुंदावत असते, ते असीम खरेच! तुम्ही जे वाचता त्याचा मतितार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ, ध्वन्यार्थ लावणे सर्वस्वी तुमच्या वकुबावर अवलंबून असते. श्रेष्ठ साहित्य एकाच मजकुरातून प्रत्येक वाचकास भिन्न अर्थ, बिंब, भाव देते. कारण वाचन प्रक्रिया ही प्रत्येकाच्या क्षमतांवर कमजोर वा जोरकस, मतिमान वा गतिमंद होणे अवलंबून असते. या प्रक्रियेची एक रीत आहे; पण तिला ठोकळ असे नियम नसतात. त्यामुळेच एक कविता, नाटक, कथा, कादंबरी वेगवेगळ्या वाचकांना अनेक प्रकारची वेगवेगळी अनुभूती देत असते. अन्वय वा अन्विती ही तुमच्या आत्मपरीक्षण, आत्मज्ञान क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे वाचन प्रक्रियेतून वाचकाचे रूपांतर सर्जकांत केव्हा होते ते कळतसुद्धा नाही. वाचन प्रक्रियेतून मुद्रित आशयाचा होणारा विकास अप्रत्याशित, अनपेक्षितपणे अपरा सृष्टी निर्मिणारा, चकित करणारा असतो. त्यासाठी वाचक आपल्या जाणिवांतील विविध क्लुप्त्या, युक्त्या वापरत असतो. मृत वा निर्जीव अंक, अक्षरादी चिन्ह्यांच्या रूढ सांकेतिक अर्थोपलीकडचा सर्वथा नवा बोध वा अर्थ निर्मिती, अनुभूती एक नवे आविष्करणच असतं. ‘जो न देखें रवि, वह देखें कवि' म्हटलं जातं. त्याचा हाच अर्थ असतो. हीच वाचन प्रक्रियेची खरी फलश्रुती असते. वाचक यासाठी पूर्वी आत्मसात केलेली कौशल्ये, शब्द, शैली, अर्थ, जाणिवा, बोध सर्वांचा लीलया वापर करून हा चमत्कार घडवून आणतो. वाचनाने ब्रह्मानंदी समाधी लागते म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हाती येणारा वाचनाचा अनपेक्षित आनंद! त्यासाठी वाचन संस्कार हवा. संस्कारातूनच संस्कृतीचा विकास घडत असतो. वाचन प्रक्रिया कधी काळी एक निर्जीव कृती होती. आज ती कला, विज्ञान, संस्कृती इत्यादी अंगांनी विकसित होत आहे. अत्त दीप भव'सारखं ती प्रक्रिया केवळ प्रार्थना, प्रेरणा गीत न राहता तो आत्मविकासाचा महामार्ग, महाद्वार बनते. परंपरागत चौकट मोडून नवा पायंडा, चेहरा, स्वरूप निर्मिणे हे वाचन प्रक्रियेच्या निरंतरेतून घडते. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' हे सूत्र वाचन प्रक्रियेचं खरे रहस्य होय. या प्रक्रियेत तुम्ही जेवढे ढुंबाल, बुडाल तेवढा तुम्हाला आनंद मिळणार.

  पूर्वी वाचन मात्र एक कृती होती. पाठांतर एक प्रकारचे कर्मकांडच होते. आता वाचनाला आकलनाची (Comprehension) पूर्वअट असते. समजून घेऊन वाचणे महत्त्वाचे. केवळ अस्खलित उच्चारण हा अभिनय, अभिव्यक्ती वा अभिवाचन या अंगांनी ते प्रगट आविष्करण ठरते.

वाचन/७८