पान:वाचन (Vachan).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो विविध ज्ञानस्वरूप वाचनातूनच फळाला येतो. वाचन निरुद्देश नसते. ते परिणामकारकच असते. म्हणून माणसाने 'स्व' जाणीव, 'स्व' विकास, सत्वबोध, सत्यशोधार्थ वाचत राहिले पाहिजे. वाचन सवय, वृत्ती होणं म्हणजे स्वत:चा शोध लागणं होय.
५.५ वाचन प्रक्रिया (Reading Process)

 वाचन म्हणजे लिखित अंक, अक्षर चिन्हांच्या संकेतांचा शोध आणि आकलन होय. माणसाला हे आकलन होते. पूर्वज्ञान, वर्तमान वाचन व वाचलेल्याची तार्किक संगती. ही सारी एक सजीव, तरल अशी गुंतागुंतीची प्रक्रिया वा पद्धत आहे. माणूस या प्रक्रियेतूनच शब्द, अर्थ, वाक्प्रचार, म्हणी, वाक्य इत्यादी रचनापद्धती शिकत असतो. यातूनच तो भाषा शिकतो. एकमेकाशी संवाद, संपर्क ठेवण्याचे साधन म्हणजे भाषा. ती वाचन प्रक्रियेतूनच विकसित होत असते. यातूनच माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि नवनवीन ज्ञान संकल्पनांचा उदय आणि विस्तार होत असतो. लिखित वा मुद्रित वा अंकीय (Digital) मजकूर आणि वाचक यांच्यातील सहसंबंधांतून वाचन प्रक्रिया आकाराला येत असते. त्याकामी वाचकाचे पूर्वज्ञान, पूर्वानुभव, जाणिवा, संस्कृती, वृत्ती, भाषासमूह प्रभाव उपयोगी पडतो. वाचन प्रक्रियेतून जे ज्ञान विकसित होते वा मिळते त्यासाठी मात्र प्रात्यक्षिक, सराव, पाठांतर, स्मरण यांचा उपयोग होतो. त्यामुळे वाचन प्रक्रियांतून एखादी गोष्ट कळणे वा समजणे सुलभ, सुबोध होत असते. यातून ज्ञानाला झळाळी व स्पष्टता येते. यासाठी मात्र तुम्हाला विश्लेषण, समीक्षा, चिकित्सा, जिज्ञासा इत्यादी कौशल्यांची कास धरणे आवश्यक असते. वाचन प्रक्रिया समृद्ध व्हायची तर वाचकात सृजनात्मक वृत्ती असणं त्याची पूर्वअट असते. साहित्य आकलन, ज्ञानप्राप्तीही एका अर्थाने मुशाफिरी असते. तुम्ही ज्ञान, विज्ञानाची नवनवी क्षेत्रे वाचन प्रक्रियेच्या जोरावर पादाक्रांत करीत असता. त्यासाठी गलिव्हर, कोलंबस, वास्को द गामा, ह्यूआन सांग यांच्यासारख्या जग शोधणाच्या धाडसींची साहसी वृत्ती, आव्हाने पेलण्याची मनीषा उरी असावी लागते. परंपरेची मळलेली पायवाट दूर सारून नवा मार्ग आक्रमिण्याचे साहस जे वीर दाखवितात त्यांनाच नवा देश, प्रदेश, प्रांत सापडत असतो. पामर किनारी विसावतात, तर साहसी भोवरे भेदून नवा प्रदेश मिळवितात. वाचन प्रक्रिया यापेक्षा वेगळी असत नाही. तुम्ही प्रयत्नशील रहाल तरच वाचनाने मोती हाती येतात.

वाचन/७७